NCP मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे सरकारचा (Shinde Government) आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती आहे. या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या काही सदस्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही 3 आमदारांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NCP Leader Ajit Pawar demand 13 berths in the ministerial council and imp departments)
मुख्यमंत्री शिंदे यांनीही लवकरच पुढील विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे. अजित पवार यांच्या गटाचा शिंदे सरकारमधील सहभाग झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 29 पर्यंत पोहचली आहे. नियमानुसार महाराष्ट्रात 43 मंत्री होण्याची मर्यादा आहे. त्यामुळे येत्या विस्तारात आता उर्वरित 14 जागा भरणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीने 14 मंत्रिपदांसह महत्वाच्या खात्यांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे आणि भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी उद्धव ठाकरे सरकामध्ये असलेली मंत्रिपद आणि खाती आपल्याला मिळावी यासाठी अजित पवार यांच्या गटाने शिंदे सरकारमध्ये प्रयत्न सुरु केल्याची माहिती आहे.
याच दाव्यामुळे पवार यांच्या गटाला खातेवाटपासाठी विलंब होत असल्याची माहिती आहे. शिंदे सरकारमध्ये एन्ट्री झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मलबार हिल येथील त्यांच्या ‘सागर’ निवासस्थानी मंत्रिपद आणि खात्याच्या वाटपावर चर्चा केली.
अजित पवार यांच्या गटाने अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, सहकार, महिला व बालविकास, सामाजिक न्याय या खात्यांवर दावा सांगितला आहे. याचवेळी पवार यांनी आणखी 5 मंत्रिपदांचीही मागणी केली. यात 2 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवार यांच्या गटातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “भाजपने आम्हाला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदांची ऑफर दिली आहे. पण आम्ही 11 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांसह 14 मंत्रिपदांची मागणी केली आहे. तसेच पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जी खाती होती त्याच खात्यांचीही मागणी राष्ट्रवादीने भाजपकडे केली आहे.