Download App

शरद पवार अजितदादांसोबत येणार, अजूनही विश्वास; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

NCP  Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार अजूनही आमच्या सोबत येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार आमचे गुरु आहेत, ते लवकरच आम्हाला समर्थन देतील. आम्ही आमच्या आशा सोडलेल्या नाहीत. ते आमच्यासाठी वडिलांच्या समान आहेत. त्यांच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया  अजित गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. यावेळी ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

पटेल पुढे म्हणाले की, “अजित पवार व माझ्या नेतृत्वामध्ये 15 जुलै रोजी आमच्या मंत्रांसह आम्ही शरद पवारांची भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ रहावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी भविष्यात देखील आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. परंतु या भेटीत शरद पवारांकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.”

शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटी नंतर अजित पवार गटाकडून 16 व 17 जुलै असे सलग दोन दिवस शरद पवार यांची भेट घेण्यात आली. यानंतर प्रफुल पटेल यांनी आम्ही शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. परंतु यानंतर भाजप व विशेषतः मोदींच्या सांगण्यावरून अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना NDAच्या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी गेले असल्याचे बोलले गेले.

अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते 18 जुलै रोजी दिल्ली येथे झालेल्या NDAच्या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी स्वतंत्रपणे बैठकीत चर्चा केली. यावर पटेल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आमची चांगली चर्चा झाली. देशाच्या व्यापक हितासाठी व नरेंद्र मोदींनी आखलेल्या विकास कामांसाठी आम्ही NDAमध्ये सामील झालो.

‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?

17 जुलै रोजी जेव्हा शरद पवार हे बंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीला गैरहजर राहिले तेव्हा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या अगोदरच अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने पवार विरोधकांच्या एकजुटीतून बाहेर पडणार असेही बोलले जात होते. परंतु 18 जुलै रोजी शरद पवारांनी बंगळुरू मध्ये विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावली व सगळ्या चर्चा निरर्थक असल्याचे दाखवून दिले. परंतु पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार खरंच अजितदादांसोबत येणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. अजित पवारांनी40 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले आहे. या पत्रामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आज नुकतेच नागालँड येथील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आगामी काळात प्रफुल्ल पटेल यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार हे अजित पवारांशी जुळवून घेणार की आपली संघर्षाची भूमिका कायम ठेवणार, ते पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

Tags

follow us