प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावानेही खाती उघडल्याचा संशय; अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर

बनावट खात्यांमधून झालेल्या एकूण व्यवहाराची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Untitled Design 20

Untitled Design 20

New threads in the Ashok Kharat case : भोंदू बाबा अशोक खरात याच्या फसवणूक प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा लागला असून, खरातने तब्बल 130 बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 2021-22 या कालावधीत विविध व्यक्तींच्या नावाने पतसंस्थांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती. समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था यांसह अनेक ठिकाणी ही बनावट खाती तयार करण्यात आली. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात यालाच नॉमिनी म्हणून दाखवण्यात आले होते. या खात्यांमधून एका दिवसात लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचे देखील तपासातून समोर आले आहे.

या बनावट खात्यांमधून झालेल्या एकूण व्यवहाराची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामध्ये काही प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावांचा देखील वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जासूद आणि चाकणकर यांच्या भगिनी आणि पुतण्याच्या नावाने देखील खाती उघडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा देखील गैरवापर झाल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.

राष्ट्रवादीतील वादावर पार्थ पवार पहिल्यांदा बोलले; सुनील तटकरे, पटेलांवर काय म्हणाले ?

दरम्यान, शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. सावकारकी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे उलगडत आहेत. पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एसआयटीने केलेला व्हीसीद्वारे हजर करण्याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी अशोक खरातला त्याचे नाव विचारले असता, आवाज कमी आल्यामुळे त्याला मोठ्याने बोलण्यास सांगण्यात आले. तसेच, तुमचे वकील म्हणून भाटे वकील बाजू मांडत आहेत, तेच तुमचे वकील आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर खरातने होकार दिला. सुनावणीच्या शेवटी तुला काही सांगायचे आहे का? या प्रश्नावर मात्र अशोक खरातने हात जोडून काही नाही असे उत्तर दिले.

Exit mobile version