Ahmednagar News : नगर अर्बन को.ऑप.मल्टीस्टेट श्येडूल्ड बँकेतील (Nagar Urban Bank) गैरकारभार आणि संचालक, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एस.आय.टी. नेमण्यात यावी. भाजपचे दिवंगत खा.दिलीप गांधी यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले आहेत. परिणामी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला व आज ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी विविध यंत्रणांचे उंबरठे झिजवत आहे. बँकेच्या गैरकारभाराबाबत पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त होऊनही संबंधित संचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. अशावेळी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून सदर गुन्ह्यांचा तपास करावा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिला आहे.
राजेंद्र चोपडा यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सविस्तर पत्र लिहून नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी संबंधित संचालक, अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चोपडा यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनाही सदर पत्राची प्रत पाठवली आहे.
साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा आरक्षण सल्लागार मंडळाला ‘क्लास वन’ सुविधा
राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे की, सन 2014 मध्ये भाजप नेते स्व.दिलीप गांधी यांनी बँकेचा कारभार हाती घेतल्यापासून बँकेत वेगवेगळ्या पध्दतीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आज बँकेची थकबाकी जवळपास 800 कोटीपर्यंत पोहचली आहे. जवळपास 400 ते 500 कोटींची थकबाकी केवळ 50 कर्ज खात्यांची आहे. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी सूचना देवूनही कारभारात सुधारणा न झाल्याने 113 वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला.
अनेक जागरूक सभासदांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिस विभागाने औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. हा अहवाल आल्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कमलाकर जाधव यांनी यांनी तपास योग्य पध्दतीने चालवला असताना त्यांची अचानक नाशिक येथे बदली करण्यात आली. त्यांच्याजागी येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना पुन्हा संपूर्ण प्रकरणाचा नव्याने अभ्यास करावा लागेल व यात फक्त वेळ मारून नेण्याचे काम होईल, अशी शक्यता आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनीही या मोठ्या गुन्ह्याच्या तपासात अतिशय चांगले काम करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे.
Rashmi Shukla : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांबद्दल जाणून घ्या…
बँकेत अनेक गोरगरीबांचे पैसे अडकलेले आहेत. दुसरीकडे संबंधित संचालक, संशयित आरोपी नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी घेताना दिसले. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर प्रसारित करीत होते. वास्तविक अर्बन बँकेत भाजपचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भ्रष्टाचारा विरोधातील कडक भूमिका सर्वांनाच माहिती आहे.
‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ हे पंतप्रधानांचे तत्व सर्वांच्या परिचयाचे आहे. त्याची प्रचीतही अनेक वेळा जनतेला आलेली आहे. अशावेळी त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केला. तरीही तपासाला गती मिळून कारवाई होत नाही. यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तपासावर दबाव येत असून भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे, अशी कुजबुज, चर्चा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांमध्ये आहे. हे वेळीच थांबायचे असल्यास सदर प्रकरणाच्या तपासासाठी तात्काळ विशेष तपास पथक नेमावे अशी मागणी चोपडा यांनी पत्रात करण्यात आली आहे.