Download App

कापड बाजारात घर नको रे बाबा आपला कल्याण रोडच बरा.. नगरकरांचं घरटंही महागलं

Ahilyanagar News : घर खरेदी करायचंय, दुकानासाठी जागा घ्यायची एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय पण कुठं तर आपल्या नगर शहरात. पण यासाठी आता जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. नगरचा लूक बदलतोय मोठ्या खेड्याची ओळखही मागं पडतेय तशीच जमिनींची अन् घरांची किंमतही वाढतेय. कापड बाजार असो की माळीवाडा, स्टायलिश सावेडी असो की शहरी लूक असलेला पाइपलाइन रस्ता.. येथे घर आणि दुकानांच्या किंमती वाढल्यात. त्यामुळे खिशाचा विचार करुन आपला कल्याण रस्ताच बरा असे नगरकर बोलत आहे. यामागचं कारण माहिती आहे का मित्रांनो नाही ना.. अहो सरकारने रेडीरेकनकच्या दरात वाढ केली अन् नगरची घरं महागलीत. 

पण हा रेडीरेकनर प्रकार तरी काय? रेडीरेकनर वाढल्याने घर, दुकान आणि जागांच्या किंमती वाढतात तरी कशा? याचं गणित सोप्पं अन् तितकीच जटीलही आहे. काळजी करू नका आज हेच गणित आम्ही तुम्हाला या बातमीत समजावून सांगणार आहोत. सर्वात आधी रेडीरेकनर म्हणजे काय आहे याची माहिती घेऊ..

रेडीरेकनर रेट म्हणजे काय?

रेडीरेकनर रेट वाढल्यामुळं घरांच्या किमती वाढल्यात. जमीन, व्यावसायिक आणि निवासी यांसारख्या रिअल इस्टेट मालमत्तेचे राज्य सरकारद्वारे नियमन केलेले आणि मूल्यांकन केलेले एक मानक मूल्य म्हणजे रेडीरेकनर होय. रेडीरेकनरच्या दरवाढीचा थेट परिणाम घरं, मोकळी जागा, दुकान खरेदीवर होणार आहे असा या रेडीरेकनरचा अर्थ होतो. म्हणजेच रेडीरेकनर वाढला आणि तुम्ही घर खरेदीचा विचार केलात तर तुम्हाला घरांच्या किंमती वाढल्याचा अंदाज येईल.

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांतीलच रेडीरेकनरचे दर निश्चित केले आहेत. नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. आता आपल्या अहिल्यानगर शहरात रेडीरेकनरचे दर किती आणि कोणत्या भागात वाढलेत, या वाढीव दरांचा मालमत्तांवर काय परिणाम होणार याची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊ..

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना धक्का; घरे महागणार, राज्यात रेडीरेकनर दरांत वाढ, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक?

कापड बाजार सर्वात महाग..

राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत वाढ केल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सरासरी ५.४१ वाढ झाली आहे. यामुळे घर, भूखंड, कार्यालय, दुकान यांचे दर वाढणार असून, खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. तसेच बांधकाम करणेही महागले आहे. अहिल्यानगर महापालिका हद्दीत कापडबाजार परिसर सर्वात महागडा ठरला आहे. तर सर्वात कमी दर फराहबाग येथील मोरचूदनगर परिसर येथील आहेत.

शासनाने तीन वर्षांनंतर रेडीरेकनर दरांमध्ये १ एप्रिलपासून महापालिकेसह ग्रामीण, नगरपरिषद क्षेत्रात वाढ लागू केली आहे. महापालिका हद्दीत जमीन दरात ४.८७ टक्के तर सदनिका दरात ८.६७ टक्के वाढ केली आहे. कापडबाजार परिसरात नगर शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जमीन आणि सदनिका दर सर्वात महाग ठरले आहेत. त्यामुळे या परिसरात नव्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी जागा, दुकान किंवा घर घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील.

चितळे रोडनेही दिलाय खिशाला झटका

नगर शहरातील अत्यंत गजबजलेलं अन् रहदारीचं ठिकाण म्हणजे चितळे रोड. चितळे रोड परिसरातील जमीन आणि घरांच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी 10 टक्के वाढ झाली आहे. येथे जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर 61 हजार 600 रुपये प्रती चौरस मीटर दराने पैसे मोजावे लागतील. या व्यतिरिक्त बागडपट्टी रोड, सर्जेपूरा रोड, दिल्लीगेट, दाळमंडई रस्ता, झेंडीगेड रोड, जुना कापड बाजार रोड, नवी पेठ, माळीवाडा, बोल्हेगाव या भागातील घर, दुकान आणि जमिनींच्या किंमती आता वाढणार आहेत.

हक्काच्या घराचं स्वप्न साकार! कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर…

गड्या आपला कल्याण रोडच बरा

नगर शहरातून जाणाऱ्या कल्याण रोड भागात लोकवस्ती वाढली आहे. रस्ते, पाणी या मुलभूत सुविधांचा विकास होत आहे. विविध विकासकामे सुरू आहेत. तरी देखील शहरातील अन्य भागाच्या तुलनेत येथील घरांच्या किंमती तुलनेने कमी राहतील. हा परिसर मुख्य शहरापासून थोडा दूर आहे हेही कारण यामागे असू शकते. आताचे रेडीरेकनरचे दर आणि मागील वर्षातील रेडीरेकनरचे दर पाहिले तर तफावत स्पष्ट दिसून येते. या भागात जमिनीसाठी 4 हजार 370 प्रती चौरस मीटर आणि सदनिकेसाठी 27 हजार 280 रुपये प्रती चौरस मीटर असा दर निश्चित करण्यात आला आहे.

विविध भागांतील रेडीरेकनर दर (प्रती चौरस मीटरमध्ये)

चितळे रोड
जमीन 37,200
सदनिका 61,600

दिल्लीगेट रस्ता
जमीन 14,800
सदनिका 40,260

कापड बाजार रस्ता
जमीन 56,110
सदनिका 77,680

माळीवाडा
जमीन 17,340
सदनिका 39,140

तपोवन रस्ता
जमीन 8,840
सदनिका 33,330

लिंक रोड
जमीन 3,080
सदनिका 26,460

बालिकाश्रम रोड
जमीन 7,890
सदनिका 31,350

कल्याण रोड
जमीन 4,370
सदनिका 27,280

असे आहेत प्रतिचौरस दर

अहिल्यानगर महापालिका हद्दीत किमान प्रतिचौरस जमीन दर 690, कमाल जमीन दर 56,110 रुपये आहे. सदनिका किमान प्रतिचौरस दर 22,430 रुपये, तर कमाल 77,680 रुपये दर आहे. ग्रामीण क्षेत्रात किमान प्रतिहेक्टरी शेतजमीन दर 2 लाख 41 हजार रुपये तर कमाल 11 लाख 47 हजार रुपये आहे. बिनशेती प्रतिचौरस किमान दर 290 रुपये तर कमाल बिनशेती दर 1,020 रुपये आहे.

follow us