हक्काच्या घराचं स्वप्न साकार! कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर…
Mla Aashutosh Kale : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात ‘पंतप्रधान आवास योजने अंतर्गत’ पहिल्यांदाच पात्र लाभार्थ्यांना एकाचवेळी 3220 घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी दिलीयं. घरकुलाच्या मंजुरीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचंही आमदार काळे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
ठाकरेंना धक्का! नगरचे शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना; आज शिंदे गटात प्रवेश
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळवून देणे, तसेच गरिबी रेषेखालील कुटुंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांत घरकुलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यात यापूर्वी देखील या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली, परंतु एकाचवेळी 3220 घरकुले मंजूर झाल्यामुळे कोपरगावकरांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे.
घरकुल मंजूर झाल्याने कोपरगावकरांचं जीवनमान उंचावणार असून कित्येक दिवसांचे स्वप्न सत्यात उतरून त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार असल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. समाजातील सर्वात गरीब आणि भूमीहीन घटकांचा विचार करून त्या नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभाग अहोरात्र प्रयत्न करत आहे त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे पंतप्रधान आवास योजनेतून स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, शबरी आवास व रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच मंजूर झालेल्या घरकुल योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी काही त्रुटी किंवा अडचणी येत असेल तर पात्र लाभार्थ्यांनी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. जरी अडचणी सुटल्या नाही तर पंचायत समिती व जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय.