Download App

उद्धव ठाकरेंना धक्का! माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात; शिर्डीत नवा डाव

Lok Sabha Election : दोन टर्म काँग्रेसचे आमदार त्यानंतर शिवसेनेत आलेले आणि पक्षफुटीतही उद्धव ठाकरेंना साथ दिलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही ठाकरेंना धक्का दिला आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांबळे यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

गेली दोन टर्म आमदार असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेला काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर कांबळे यांनी ठाकरेंबरोबर राहणे पसंत केले होते. शिर्डी लोकसभेच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर आले असता त्यावेळेस देखील कांबळे हे उद्धव ठाकरेंसोबत दिसले होते. मात्र लोकसभेआधीच त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

‘शिर्डी’त नवं पॉलिटिक्स! खा. लोखडेंना वाढला विरोध; पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिर्डी लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिर्डीची जागा ही शिवसेनेची असल्याने शिंदे गटाकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. मात्र याआधीच भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर असलेले नाराजी पाहता कांबळे यांचा लोकसभेपूर्वीच झालेला प्रवेश हा कांबळे यांच्यासाठी उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे.

शिर्डी लोकसभेवर भाजप आणि मनसेकडूनही दावा केला जातो आहे. मनसेचे इंजिन महायुतीला जोडले गेले तर बाळा नांदगावकर यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडून अद्याप शिर्डीसाठी कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे या मतदारसंघात आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shirdi Loksabha : लोखंडेंचा पत्ता कट तर घोलपांना संधी? मविआचे उमेदवार कोण?

शिर्डीत भाऊसाहेब विरुद्ध भाऊसाहेब लढत

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिर्डीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे काहीसे नाराज झाले होते. आता आपल्याला तिकीट मिळणार नाही याची खात्री त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आता त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळते का याची उत्सुकता आहे. सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध नाराजी वाढली आहे.

खासदार लोखंडेंऐवजी दुसरा उमेदवार द्या अशीही मागणी केली जात आहे. त्यामुळे लोखंडेंची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यात आता कांबळे यांची शिंदे गटात एन्ट्री झाल्याने उमेदवारीसाठी त्यांचा विचार होऊ शकते. असे जर झाले तर सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे शिंदे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारत  येत नाही.  जर हे गणित प्रत्यक्षात उतरले तर शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध भाऊसाहेब कांबळे अशी लढत झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

follow us