‘शिर्डी’त नवं पॉलिटिक्स! खा. लोखडेंना वाढला विरोध; पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
Shirdi Lok Sabha : शिर्डीचे दोन टर्मचे खासदार. आता पुन्हा निवडणुकीची तयारी. अजून तिकीट फायनल नाही पण, पक्षांतर्गत विरोध आणि दावेदारी मात्र वाढलेली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची. आता तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजकारणामुळे लोखंडे यांची उमेदवारीच धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका हे होणार असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून तयारीला वेग प्राप्त झाला आहे. शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या उमेदवारीवरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. लोखंडे यांच्या उमेदवारीला आता पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे. पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे आता लोखंडे यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
शिर्डी लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यातच ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे हे लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जातात तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी निश्चित मानले जात होती. मात्र लोकसभेपूर्वीच भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये विद्यमान खासदार लोखंडे यांच्या विरोधात नाराजी असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे. मोदी लाटेत दोनदा निवडून आलेले लोखंडे यांचे मतदारसंघात कोणतेही काम नाहीत तसेच संपर्क कमी असल्याने पदाधिकाऱ्यांसह जनतेने देखील त्यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
माझी राज्यसभा लोखंडेंना द्या, शिर्डीतून मी लढतो, आठवलेंनी दिला महायुतीला फॉर्म्युला
लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना शिंदे गटातील अंतर्गत वाद उफळून आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातीलच पदाधिकाऱ्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या नाराजीतून शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देखील दिले आहेत.
यामुळे लोखंडेंची उमेदवारी तर धोक्यात आलीच आहे मात्र त्याचबरोबर शिंदे गटाला शिर्डीतून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले म्हटल्यानंतर या गोष्टीचा विचार शिंदे गटातील नेत्यांना करावा लागणार आहे. शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख अनिता जगताप यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदार संघामध्ये कोणतीही विकासकामे केली नाहीत किंबहुना ते मतदारसंघात फिरत देखील नाही अशी जनभावना आहे. लोखंडे यांना उमेदवारी दिली तर पराभवला सामोरे जावे लागेल अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दोन टर्म असलेले खासदार यांनी कोणतेही काम न केल्यामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये लोखंडे यांच्या कारभाराबाबत नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
Utkarsha Rupwate : काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभेच्या रिंगणात
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अद्याप भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाली नाही. मात्र आता शिर्डीमध्ये विद्यमान खासदारांविरोधात असलेली नाराजी पाहता भाजप या जागेवर उमेदवार देणार का? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी ही अधिकृत मानली जात असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या शिर्डी मतदारसंघात शिंदेंना धक्का बसणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल. लोखंडेंच्या उमेदवारीला नकार देण्यात आला तर भाजपा या जागेवर दावा करत कोण उमेदवार देणार याकडे देखील राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.