Ram Shinde : निलंबनाची, शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakridhna Vikhe) यांनी दिले असताना अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईच्या कारभारावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) संतापले आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला असून आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उपोषणास बसणार आहे, असा इशारा आमदार राम शिंदे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की सिना डॅम निमगांव गांगर्डा येथील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील कुकडी विभाग क्रमांक 2 ता.श्रीगोंदा कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिशाभूल करुन खोटी उत्तरं दिली. पाणी शिल्लक असताना देखील शेतकऱ्यांना वेठीस धरून आवर्तन न सोडता जनतेच्या मनात शासनाविरोधात संताप निर्माण होईल व शेतकऱ्यांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान केले. नियमात नसताना बेकायदेशीररित्या परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून वेळकाढूपणा केला. मी सदरचा प्रश्न उपस्थित केल्याने पालकमंत्र्यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबन व शिस्तभंगविषयक कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
Manoj Jarange : “आजच्या अधिवेशनात काही झालं नाही तर आम्ही”.. जरांगे पाटलांंचा स्पष्ट इशारा
निमगांव गांगर्डा येथील ग्रामपंचायतीने तलाठी कार्यालयाची इमारत बांधकामासाठी आपल्या कार्यालयाकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत 2 वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने पालकमंत्री महोदयांनी सदर बाब ही गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधितांवर दप्तर दिरंगाई झाली असल्याचे स्पष्ट होत असून कारवाई करण्यात यावी यावर जिल्हाधिकारी यांना तात्काळ कारवाई करतो असे उत्तर दिले. त्यामुळे किरण देशमुख यांच्यावर तत्काळ सेवा निलंबनाची कारवाई करण्यात यावी. निमगांव गांगर्डा येथील तलाठी कार्यालय ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने व दप्तर दिरंगाई झाली असल्याने संबंधितांवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आज सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार आहे, असा इशारा राम शिंदे यांनी निवेदनात दिला.
विखे विरुद्ध शिंदे वाद पुन्हा चव्हाट्यावर
भाजपचे आमदार राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हा वाद जिल्ह्याला माहिती आहे. एकाच पक्षात असलेल्या या दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध काही केल्या थांबत नाही. 2019 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर व पक्षात आलेल्या विखे पिता-पुत्राविरुद्ध शिंदे हे नेहमीच आक्रमक राहिलेत. लोकसभेच्या निवडणुकीची देखील त्यांनी तयारी केली आहे. विखेंची कोंडी करण्यासाठी शिंदे यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले असल्याचे बोलले जाते. यातच आता आमदार शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांना घेरण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करताना दिसत आहे.
कोणीतरी हलक्या कानाचा असेल पण जनता नाही; पक्षांतराच्या वावड्यांवर थोरातांचा विखेंना टोला