कोणीतरी हलक्या कानाचा असेल पण जनता नाही; पक्षांतराच्या वावड्यांवर थोरातांचा विखेंना टोला
Balasaheb Thorat News : कोणीतरी हलक्या कानाचा असेल पण जनता नाही, जनतेला काँग्रेसवाले भक्कम असल्याचं माहित असल्याचा टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे. दरम्यान, लोणावळ्यातील मेळाव्यात थोरातांनी विखेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर खासदार सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला आहे. मुंबईत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
अंकितांनी तीनच वाद सांगितले; पण पवार-पाटील घराण्यात संघर्षाची वात 50 वर्षांपूर्वीच पेटली आहे…
बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, कोणीही भाजपात जाणार नाहीत. खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरु आहे. जयंत पाटलांबद्दल सकाळपासून बातम्या सुरु आहे, अखेर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन हे नाकारलं आहे. माझ्याबाबतही माध्यमांमध्ये बातमी दाखवत आहेत. कोणीतरी कोणाला तरी सांगितलं मला ते कळलं असं एक जण म्हणतोयं पण तो एक जण हलक्या कानाचा असेल पण जनता हलक्या कानाची नाहीये, जनतेला काँग्रेस भक्कम असल्याची माहित असल्याचा टोला थोरातांनी लगावला आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याबाबत सुजय विखे यांनी दावा केला होता. ते म्हणाले होते, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही भाजपच्याच वाटेवर असल्याचं माझ्या कानावर आलं असून काही दिवसांपासून जे जे काँग्रेसचे जे कार्यक्रम झाले आहेत. त्या कार्यक्रमातील फ्लेक्सवर सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. वरील सर्व नेत्यांचे फोटोच गायब का झाले आहेत? याचं कारण म्हणजे माणूस दुसरीकडे जात आहे, किंवा फोटो टाकल्यानंतर निवडणुकीत पडणार असल्याची भीती आहे, अशी टोलेबाजी सुजय विखेंनी केली आहे.
थोरात यांनी यावेळी उद्याच्या अधिवेशनावरही भाष्य केलं असून ते म्हणाले, अचानक हे अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. कामकाज सल्लागार समिती घेणं आवश्यक असतं त्यामध्ये हा विषय मांडणं आवश्यक असतं. अधिवेशनात काय मांडावं यावर चर्चा झाली असल्याचं थोरात यांनी सांगितलं आहे. कामकाज सल्लागार समिती न झाल्यामुळे आम्हाला बाकी काही माहीत नाही पण परिस्थिती पाहून आम्ही प्रश्न विचारू असंही ते म्हणाले आहेत. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असं आमचं मत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न देता हे आरक्षण मिळालं पाहिजे, टिकेल असं आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले आहेत.