अंकितांनी तीनच वाद सांगितले; पण पवार-पाटील घराण्यात संघर्षाची वात 50 वर्षांपूर्वीच पेटली आहे…
“आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा”. असे म्हणत 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबाविरुद्ध उघड शड्डू ठोकला. त्यावेळीपर्यंत छुपा असलेला संघर्ष आता उघड आणि आरपार होणार असल्याचा त्यांचा इशारा होता. या इशाऱ्याच्या पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार-पाटील घराण्यातील वाद चर्चेत आला आहे. “अजितदादांनी तीनवेळा आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, हे अंकिता पाटील यांचे वक्तव्य या चर्चांना कारणीभूत ठरले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंदापूरचे पाटील आणि बारामतीचे पवार या दोन कुटुंबामधील हाडवैर हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हा वाद उघडपणे चर्चेत येऊ लागला. पण या वादाला पाच-दहा नाही तर जवळपास 40 वर्षांचा इतिहास आहे. माजी खासदार शंकरराव पाटील विरुद्ध शरद पवार, हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार आणि आता अंकिता पाटील विरुद्ध अजित पवार अशा तीन पिढ्यापर्यंत या वादाचे मूळ सापडते. पण या दोन घराण्यांमध्ये संघर्षाची वात कुठून पेटली ते पाहणे महत्वाचे ठरले. (Shankarao Patil vs Sharad Pawar, Harshvardhan Patil vs Ajit Pawar and now Ankita Patil vs Ajit Pawar.)
इंदापूर हा ‘पाटलांचा’ भक्कम बालेकिल्ला. 1952, 1957, 1962, 1967, 1972 आणि 1978 अशी तब्बल सहावेळा शंकरराव पाटील (Shankarao Patil) यांनी विधानसभा गाठली. सलग निवडणुका जिंकत एका बाजूला शंकरराव पाटील इंदापूरमधून महाराष्ट्राचा नेता म्हणून मान्यता मिळवत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारच्या मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) नावाच्या नेत्याचा उदय होत होता. 1967 साली शरद पवारांनी पहिली निवडणूक जिंकली. यशवंतरावांच्या नेतृत्वात ते राजकारणात एक एक पायरी वर चढत होते. बघता बघता ते 1978 साली म्हणजे अवघ्या 11 वर्षात मुख्यमंत्रीही झाले.
अशोक चव्हाण भाजपमध्ये… काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?
त्यानंतरच्या काळात पवार पुलोदमध्ये तर पाटील काँग्रेस आयमध्ये. 1980 साली बारामतीमधून काँग्रेस आयने शंकरराव पाटील यांना मैदानात उतरविले. तर जनता पक्षाने संभाजीराव काकडे यांना आणि पवारांनी मोहन धारियांना तिकीट दिले. त्या निवडणुकीत शंकरराव पाटील यांनी विजय मिळविला. काकडे आणि धारिया पराभूत झाले. इंदापूर हा बारामतीच्या जवळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने इथे पवारांचा प्रभाव तयार झाला होता. त्यामुळे पाटील यांनी धारियांचा पराभव केला असला तरीही तो प्रत्यक्षात तो पवारांचा पराभव होता. मुख्यमंत्री राहुनही पवारांना होमग्राऊंडवरच मात मिळाली. इथेच दोघांमध्ये पहिली ठिणगी पडली होती.
पवारांना या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली 1984 साली. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या निधनानंतर झालेल्या त्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसचे वारे होते. काँग्रेसने (Congress) जवळपास 404 एवढ्या ऐतिहासिक जागा जिंकल्या. मात्र त्या सहानुभूतेच्या लाटेतही महाराष्ट्रात समाजवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले होते. एक होते शरद पवार आणि दुसरे साहेबराव डोणगावकर. शरद पवारांनी शंकरराव पाटलांना आस्मान दाखवले.
1985 साली शरद पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव पाटील तर जनता पक्षाने संभाजीराव काकडे यांना तिकीट दिले. संभाजीराव काकडे यांनी शंकरराव पाटील यांचा पराभव केला. पवारांच्या मदतीमुळेच काकडे निवडून आल्याची चर्चा झाल्याने पवार-पाटील घराण्याच्या संघर्षात आणखी एक निवडणूक पार पडली. पवार यांनी एका पराभावाची सव्याज परतफेड केली.
पुढे पवार काँग्रेसमध्ये आले. 1989 च्या निवडणुकीत शंकरराव पाटील यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले. त्यावेळी ते निवडून आले. त्यांनी जनता दलाच्या संभाजीराव काकडे यांचा पराभव केला. पवार-पाटील यांच्यात झालेली ती पहिली आणि शेवटची मैत्रीपूर्ण निवडणूक ठरली. 1991 साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसकडून पुन्हा एकदा शंकरराव पाटील यांनी तयारी सुरु केली. विद्यमान खासदार असल्याने पुन्हा त्यांनाच तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित होते. पण मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी खेळी केली. आपल्या पुतण्याचे राजकीय लाँचिंग केले. शंकरराव पाटील यांना डावलून अजित पवार यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यात ते यशस्वी झाले. अजितदादांनी ही निवडणूक जिंकली.
शंकरराव पाटील यांना हा अपमान चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यातून ते काँग्रेसपासून लांब गेले. 1996 साली शरद पवार स्वतःच काँग्रेसकडून लोकसभेला उभे राहिले. तर काँग्रेसने डावलल्यामुळे शंकरराव पाटील यांनी अपक्ष मैदानात उडी घेतली. त्यांना भाजप-शिवसेने पाठिंबा दिला. पवार यांच्यासाठी ती आजवरची सगळ्यात अवघड निवडणूक ठरली होती. सुप्रिया सुळे 2014 साली 70 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. पण त्यांच्यापेक्षाही पवार यांना 1996 ची निवडणूक अवघड गेली होती. अखेरीस पवारांनी शंकरराव पाटील यांना एक लाख 60 हजारांच्या मताधिक्याने आस्मान दाखविले.
दुसऱ्या पिढीतील संघर्ष :
एका बाजूला शरद पवार-शंकरराव पाटील यांच्यात संघर्ष सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला शंकरराव यांचा पुतण्या हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांचा पुतण्या अजित पवार या दुसऱ्या पिढीतही संघर्षाची ठिणगी पडली होती. 1994 साली हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले. त्यावेळी अजित पवारांमुळेच तिकीट नाकारले असा आरोप करत त्यांनी बंडाचे निशाण फडकविले. काँग्रेसविरोधात अपक्ष उभे राहून हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषदेत विजयी झाले. त्यानंतर 1995 साली हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, तेव्हा काँग्रेसने तत्कालिन आमदार आणि धनगर समाजाचे नेते गणपतराव पाटील यांना तिकीट दिले.
Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच निर्णय; जागा वाटपावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
तेव्हाही शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामुळेच तिकीट नाकारले असा आरोप करत पाटलांनी अपक्ष उडी घेतली आणि विजयी झाले. त्यावेळी सेना-भाजप युती सरकारला पाठिंबा देत पाटील मंत्रीही झाले. त्यातून पवार काका-पुतण्याच्या विरोधात पवारांना त्यांच्याच जिल्ह्यात आणि मतदारसंघात पर्याय उभा करण्याचा हा भाजप आणि शिवसेनेचा पहिला प्रयत्न होता. पण तो फारसा यशस्वी झाला नाही.
1999 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या किसन नरुटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरलीधर निंबाळकर यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील यांचा सामना झाला. याही निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील अपक्ष आमदार झाले. त्यावेळी विलासरावांच्या नेतृत्वात आघाडी सरकार सत्तेत आले होते. पण त्या सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा नसल्याने आघाडीने अपक्षांचा पाठिंबा घेतला होता. त्यात हर्षवर्धन पाटील यांचाही पाठिंबा होता. याशिवाय विलासरावांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख असल्याने मंत्रीपदी वर्णीही लागली.
पण जशी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, तसा पुन्हा एकदा अजितदादा-हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद उफाळून आला. राष्ट्रवादी काँग्रेसने विलासरावांना जोरदार विरोध करायला सुरुवात केला. अगदी पाटील जर मंत्री असतील तर आपण सरकारमधून बाहेर पडू अशी धमकी देण्यापर्यंत हा वाद गेला होता. सुरुवातीला विलासराव हर्षवर्धन पाटलांचा राजीनामा घ्यायचा नाहीच अशा मनस्थितीमध्ये होते. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी शेकापच्याही पाठिंब्याची सोय केली होती.
पण अखेरीस विलासरावांना नाईलाजास्तव पाटलांचा राजीनामा घ्यावा लागला. पवार काका-पुतण्यांनी पाटील कुटुंबाचा जाहीररित्या केलेला हा दुसरा अपमान ठरला होता. पण ना विलासरावांनी पाटलांना सोडलं ना त्यांनी विलासरावांना सोडलं. 2002 मध्ये पवार यांच्या छुप्या विरोधानंतरही पाटलांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागली. 2004 काँग्रेसने इंदापूर आपल्याकडे घेत तो पाटील यांच्यासाठी सोडला. पाटील यांनी अपक्ष राहूनच विजय मिळवला.
अंकिता पाटील यांनी उल्लेख केलेल्या तीन निवडणुकांचा इतिहास :
2009 च्या निवडणुकीपूर्वी मात्र विलासरावांनी पाटलांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले. 1994 साली सोडलेला हात पाटलांनी 2009 ला पुन्हा धरला. त्यावेळी त्यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मदतही केली. सुळे निवडून आल्या. त्यामुळे आता वेळ विधानसभेला पाटील यांना मदत करण्याची होती. पण इथूनच सुरु झाला अंकिता पाटील यांनी आरोप केलेल्या निवडणुकीचा इतिहास. त्या निवडणुकीत अजितदादांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या दत्तामामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात रिंगणात उडी घेतली. शरद पवार आणि अजित पवार यांनीही त्यांना पाठिंबा दिल्याची चर्चा होती. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर पवारांनी नमते घेतले आणि पाटलांचा अवघ्या आठ हजार मतांनी विजय झाला.
2014 साली पाटील यांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत केली. पण विधानसभेला युती तुटली आणि दत्तामामा भरणेंना राष्ट्रवादीकडून अधिकृत तिकीट मिळाले. त्यावेळी हर्षवर्धन पाटलांचा 14 हजार मतांनी पराभव झाला. 2019 च्या लोकसभेला पुन्हा पाटील यांनी सुळेंना मदत केली. सुळे निवडून आल्या, त्यांना इंदापूरमध्ये लीडही मिळाले. बदल्यात विधानसभेची जागा काँग्रेसला सोडायची अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिला. “त्यावेळी आपण अनेक दिवस काँग्रेस नेत्यांकडे आशेने पाहत होतो. पण आपल्याला शब्द मिळाला नाही. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने दगाबाजी, फसवणूक, लबाडी केली आणि स्वपक्षाने वाऱ्यावर सोडले. आपण कात्रीत सापडलो,” असे म्हणत त्यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर आता माझा मार्ग मोकळा आहे. आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला आता आक्रमकपणा बघा, असे म्हणत त्यांनी पवारांविरोधात उघड तलवार उघडली होती.
आता हीच तलवार अंकिता पाटील यांनी हातात घेतली आहे. पण अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची मदत लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी अंकिता पाटील यांच्या वक्तव्यावर ” नवीन जनरेशन काही बोलली म्हणून लगेच उत्तर द्यायचे नसते”. असे म्हणत अतिशय सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा ताईंना मदत करण्याच्या बदल्यात इंदापूर अजितदादा भाजपसाठी सोडतात का?, अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद मिटणार का? की पुन्हा एकदा लोकसभा झाल्यानंतर अजितदादा दत्तामामांसाठीच जोर लावणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.