अशोक चव्हाण भाजपमध्ये… काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?

अशोक चव्हाण भाजपमध्ये… काँग्रेस अन् अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे?

“अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नव्हे तर महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहात आहे. तुम्हाला वारसा आहे. तुमचे वक्तृत्वही चांगले आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात फिरा. राज्यात फिरण्याची हीच वेळ आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू”. रविवारी लातूरमधील निवळीमध्ये विलास सहकारी साखर कारखान्याच्या आवारात लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) स्मृती सोहळा, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण, ‘विलास भवन’ या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन असा भरगच्च कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यापासून विश्वजित कदम यांच्यापर्यंत सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांच्या तोंडी हा एकच सूर होता… “अमित देशमुख तुम्ही आता बाहेर पडा. राज्यव्यापी व्हा”!

आता यावर अमित देशमुख काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येईलच. पण सर्वच नेत्यांचा असा सूर का होता? काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात नेमके काय सुरु आहे? अमित देशमुखांच्या डोक्यात काय सुरु आहे? पाहुया… (After Ashok Chavan joining BJP, Amit Deshmukh has a chance to become the face of Congress in Marathwada.)

मराठवाड्यात एकेकाळी काँग्रेसच्या नेत्यांची मोठी फळी होती. शंकरराव चव्हाण, केशरकाकू क्षीरसागर, रफिक झकेरिया, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण, राजीव सातव असे एकापेक्षा एक मातब्बर नेते काँग्रेसने दिले. यातील शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण असे चार मुख्यमंत्री काँग्रेसने मराठवाड्यातून दिले. झकेरिया मंत्री झाले, त्यांच्या कामामुळे त्यांचे नाव देशभर गाजले. झकेरिया नसते तर कदाचित आजचे छत्रपती संभाजीनगर जसे आहे तसे दिसलेही नसते. केशरकाकु यांचा थेट इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क होता. शिवराज पाटील यांनी देखील केंद्रात गृहमंत्रीपर्यंत मजल मारली. विलासराव देशमुख यांचा तर लातूर जिल्ह्यावर एवढा होल्ड होता की, मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना उमेदवारी दिली. लातूरच्या मतदारांनी देखील विलासरावांच्या शब्दावर विश्वास ठेवून कधी चेहराही न बघितलेल्या आवळे यांना अवघ्या 10 दिवसात खासदार केले. राजीव सातव म्हणजे राहुल गांधी यांच्यासाठी दुसरे भाऊच होते.

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम पण चिन्ह कधी मिळणार? SC चा निर्णय

पण आता मात्र काँग्रेसची अवस्था सध्या अक्षरश: कुपोषित झाली आहे. केशरकाकू यांच्यानंतर रजनी पाटील यांच्याकडे बीडमधील काँग्रेसची धुरा आली. रजनीताई पाटील यांना राज्यसभा देण्यात आली. पण त्यामुळे बीडच्या काँग्रेस संघटनेला बळ मिळाले नाही. हिंगोलीमध्ये दिवंगत नेते राजीव सातव यांच्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषद मिळाली. मात्र, त्यांच्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये नवेच वाद सुरू झाले. असे म्हणतात की भारत जोडो यात्रेच्या वेळी बाळासाहेब थोरात यांना त्या वादात लक्ष घालावे लागले होते. जालन्यातील विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांचा संपर्क फक्त समाजातील काही मोजक्याच व्यक्तींबरोबरचा मर्यादित आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी ते कोठेच उपयोगी पडत नसल्याचेही आवर्जून सांगण्यात येते.

ज्यांना नेता म्हणून चेहरा होता ते होते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख. पण या दोन्ही नेत्यांमधील वादाने काँग्रेसला मराठवाड्यात उभारी मिळाली नाहीच. त्यांच्यातील या वादाने मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला.

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे शंकरराव चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानत होते. त्यांच्यातील गुरू-शिष्याचे नाते सर्वश्रृत होते. विलासराव देशमुख यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली तेव्हा शंकरराव चव्हाण यांनीही त्यांना ताकद दिली. त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. आपल्या मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली. पुढे विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्रीपदावर मजल मारली. तेव्हा अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात उद्योगमंत्रिपदाची संधी देऊन शंकररावांच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. 26/11 च्या हल्ल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्रिपद सोडण्याची वेळ आली, तेव्हा अशोक चव्हाण यांना त्या पदावर बसवण्यासाठी विलासरावांनी दिल्लीदरबारी वजन खर्ची घातले.

मात्र मुख्यमंत्री असताना चव्हाण नांदेडसाठी थोडे जास्त झुकते माप देत असल्याने विलासराव काहीसे नाराज झाले होते. महसूल आयुक्तालयाच्या मुद्यावरून चव्हाण-देशमुख वादात पहिली ठिणगी पडली. अशोक चव्हाणांनी महसूल आयुक्तालय नांदेडला दिले आणि विलासरावांशी वैर घेतले. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा उर्वरित कालावधी संघर्षातच गेला. आयुक्तालायापाठोपाठ मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत घेऊन जाण्याला लातूरकरांनी विरोध दर्शवला होता. त्यावेळीही चव्हाण-देशमुखांमध्ये वादाचा दुसरा अंक बघायला मिळाला होता. पुढे विलासराव देशमुख यांचे अकाली निधन झाल्यानंतर चव्हाण-देशमुखांमधील वाद मिटेल असे वाटत होते. मात्र हे वितुष्ट कमी करण्याठी प्रयत्न करण्यासाठी चव्हाणांनी मोठेपणा दाखवला नाही. याउलट अशोक चव्हाण मराठवाड्याचे नेते आहेत. त्यांचे नेतृत्व आपण जपायला हवे असे म्हणत आतापर्यंत अमित देशमुख यांनी काहीसे नमतेच घेत होते.

Jayant Patil : प्रसिद्धीशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही; जयंत पाटलांनी टाकला उलट फासा

मात्र आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळेच मराठवाड्यात काँग्रेसचा तंबू पुन्हा मजबूत करायचा असले तर अमित देशमुख यांना चेहरा म्हणून मान्यता द्यायला हवी, असा रविवारी पार पडलेल्या मेळाव्यातील नेत्यांच्या भाषणाचा रोख होता. “अमित देशमुख, तुम्ही केवळ लातूरपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभर फिरा. आज ती गरज आहे”, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तर “भविष्यकाळ तुमचा आहे. देश व राज्य कठीण स्थितीतून जात आहे. अशावेळी तरुणांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पुढे आले पाहिजे. आम्ही ज्येष्ठ तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहोत”, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला. थोडक्यात काय तर आता मराठवाड्यात देशमुख यांच्याकडेच धुरा राहील असा संदेश देण्यात काल नेते यशस्वी ठरले आहेत.

याशिवाय अमित देशमुख यांचा स्वभावही शांत आणि सौम्य प्रत्तुत्तर देण्याचा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक असल्याने देशमुख यांच्या या थंडा करके खाओ चा स्वभाव नेतृत्व म्हणून उपयोगी पडू शकतो, अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे. मध्यंतरी तेही अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. लोणावळ्यातील शिबिरासाठी दोन्ही बंधूंनी पुढाराक घेऊन सर्व नेत्यांना निमंत्रण दिले. त्यानंतर आता त्यांना काँग्रेसच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी नेतृत्व करण्यासाठी साद दिली आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेत्यांनी दिलेली साद अमित देशमुख कितपत गांभीर्याने ऐकतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जर त्यांनी प्रतिसाद द्यायचे ठरवले तर त्याची सुरुवात लातूरपासूनच करावी लागणार आहे. कारण अमित देशमुख हे लातूरच्या स्थानिक राजकारणात फारसे सक्रिय नसतात. स्थानिक राजकारण, कारखाना, बँक या संस्थांचे राजकारण धीरज देशमुख बघतात. अमित देशमुख राहण्यासाठीही मुंबईत असतात. त्यामुळे लातूर शहर आणि ग्रामीण हे दोन मतदारसंघ वगळता काँग्रेसची फारशी ताकद दिसून येत नाही. आता जर मराठवाड्यात काँग्रेसची पुनर्बांधणी करायची असले तर त्यांना आधी लातूरचा किल्ला भक्कम करावा लागणार आहे. लातूरमध्ये पुन्हा काँग्रेसचे वातावरण तयार करावे लागेल.

सध्या काँग्रेसची सर्वच प्रमुख विदर्भात आहेत. यात प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे आहे, विरोधी पक्षनेते पद विजय वडेट्टीवार यांच्याकडे आहे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कुणाल राऊत यांच्याकडे आहे. तर महिला प्रदेश काँग्रेसचे संध्या सव्वालाखे यांच्याकडे आहे. यातील एखादे-दुसरे पद मराठवाड्यात घेऊन नेते तयार करावे लागतील. सरकार हातात नसताना संघटनेच्या माध्यमातून नेत्यांची फळी उभी करण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. आता ही करामत अमित देशमुख कसे करतात, केली तर लातूरमधील शक्तीप्रदर्शन ही त्याची सुरुवात तर नाही ना? हे येणारा काळच महाराष्ट्राला दाखवून देईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube