Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपातील मोठे नेते एकनाथ खडसे सध्या (Eknath Khadse) शरद पवार गटात आहेत. परंतु खडसे आता लवकरच भाजपात वापसी करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून राजधानी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खडसे भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. या घडामोडींनंतर शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
पुण्यातील एका बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचा काहीही फायदा होणार नाही हे आम्ही शरद पवारांना सांगितले होते. खडसेंबाबत घेतलेला निर्णय हा आपली मोठी चूक होती हे आता पवार साहेबांनी मान्य केलं.
Eknath Khadse : ..तर मी गिरीश महाजनांना भर चौकात जोड्याने मारेन; नाथाभाऊंचा पलटवार
एकनाथ खडसे यांनी पक्षात प्रवेश करताना उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवारांना दिले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यांनी पक्ष तर वाढवला नाहीच उलट पक्षाचे वाटोळे केले अशी घणाघाती टीका पाटील यांनी केले.
रावेर मतदारसंघात भाजपने त्यांची सून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात खडसे उमेदवारी करतील असे वाटले होते. परंतु, आपल्या आजारपणाचे खोटे कारण देत रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यास खडसेंनी नकार दिला. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत ही त्यांची मोठी खेळी होती, अशी टीका पाटील यांनी केली.
मध्यंतरी एकनाथ खडसे दिल्लीला गेले होते. ते दिल्लीला का गेले होते, तेथे कुणाच्या भेटी घेतल्या या गोष्टी आता समोर आल्या आहेत. एकनाथ खडसेंनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) फसवणूक केली अशी टीका सतीश पाटील यांनी केली.
“होय, मी भाजपात प्रवेश करणार”, नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं