अहमदनगर – आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलतांना भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिफारशी, लॉबिंग, सर्व्हे हे सगळं मागच्या सहा महिने आधी पासून सुरू आहे. माझं होतं ते पद गेलं, माझ्या पदाची काळजी करू नका, मी मागच्या दाराने थेट आता पुढे आहे, असा टोला शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंना लगावला. (ahmednagar news)
राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन केले असून त्याच अनुषंगाने नगर जिल्ह्यात देखील महायुतीचा मेळावा आज पार पडला. यावेळी. आमदार राम शिंदे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तसेच त्यांनी आगामी लोकसभेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. लोकसभेच्या उमेदवारीवरून बोलताना ते म्हणाले की कोण उमेदवार उभा राहणार? कोण निवडून येणार? हे अजिबात महत्त्वाचे नाही. शिवाय, निवडणुकीचे तिकीट कोणाला मिळणार हे कोणालाच माहिती नाही. पण, या मेळाव्याच्या माध्यमातून आपण एकच संदेश घेऊन घेतला पाहिजे की, पुन्हा एकदा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच झाले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असं राम शिंदे म्हणाले.
खर्गेंनी ‘तिरंगा’ सोपविला… राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात
ते म्हणाले, महायुतीचा खासदार आणि महायुतीचाच आमदार झाला पाहिजे, त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असं शिंदे म्हणाले.
शिफारशी, लॉबिंग हे सगळं सहा महिन्यापासून सुरू आहे. माझं होतं ते पद गेलं. माझ्या पदाची काळजी करू नका…. मी थेट मागच्या दाराने पुढं आलो. निवडणुकीच्या अनुषंगाने आता अमित शहा व जेपी नड्डा यांचे हे तंत्रज्ञान सुरु आहे, असंही शिंदे म्हणाले.
निवडणुकांच्या काळात कुरघोड्या नको
राज्यात पहिले युतीचे सरकार होतं. मात्र आता अजित पवारांच्या साथीने राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुका असल्याने आता तरी कुरघोड्या करायला नको. काही तक्रारी असतील तर आपआपल्या पक्ष नेतृत्वाकडे त्या कराव्यात तसेच समन्वयाची भूमिका पार पाडणाऱ्यांकडे देखील काय अडचणी आहेत, त्या सांगाव्या. मात्र जनतेमध्ये याचे प्रदर्शन करू नका, असा सल्ला देखील यावेळी मंचावरून शिंदे यांनी दिला.
नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, फिर एक बार, मोदी सरकार, बार बार मोदी सरकार असा घोषणाही शिंदे यांनी दिल्या.