खर्गेंनी ‘तिरंगा’ सोपविला… राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात

खर्गेंनी ‘तिरंगा’ सोपविला… राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात

थौबल : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत न्याय यात्रे’ची मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून आजपासून (14 जानेवारी) सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी हाती तिंगरा सोपवून राहुल गांधी यांच्या या यात्रेला मार्गस्थ केले. आता 20 मार्च रोजी मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. देशातील 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून 67 दिवसांचा प्रवास करत यात्रा मुंबई गाठणार आहे. (Congress leader Rahul Gandhi’s ‘Bharat Nyaya Yatra’ started today from Thoubal district in Manipur.)

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6,200 किलोमीटरची ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा 14 राज्यांमधून आणि 85 जिल्ह्यांतून निघणार आहे. यात्रेच्या नावासोबतच प्रकारातही यंदा बदल करण्यात आला आहे. गतवेळची भारत जोडो यात्रा पायी होती. मात्र ‘भारत न्याय यात्रा’ ही बस यात्रा असणार आहे. भारत न्याय यात्रा, या नावातच यात्रेचे उद्दिष्ट प्रतिबिंबित होत आहे, ‘सबके लिए न्याय चाहिये…’ ही भूमिका घेऊन यात्रा तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गतवर्षीच्या जानेवारी महिन्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) संपन्न झाली. 136 दिवसांत काँग्रेसची भारत जोडो यात्रा 12 राज्यांतील 75 जिल्हे आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून गेली होती. या यात्रेचा उद्देश भारताला एकसंध करण्याबरोबरच देशाला बळकट करणे हा असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. ही यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि सुमारे 4000 हुन अधिक किलोमीटरचे अंतर कापून 136 दिवसांनी काश्मीरमध्ये सांगता झाली होती.

इंफाळऐवजी थौबलमधून यात्रेची सुरुवात :

यापूर्वी काँग्रेसची यात्रा मणिपूरची राजधानी इंफाळ येथून या यात्रेची सुरुवात होणार होती. इंफाळ येथील हट्टा कांगजेइबुंग मैदानातून यात्रा सुरू करण्यासाठी परवानगीही मागितली होती. तसा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. पण पोलीस प्रशासनाने काही अटी टाकल्या होत्या ज्या काँग्रेसला मान्य नव्हत्या. पोलिसांनी यात्रेसाठी फक्त एक हजार लोकांना परवानगी दिली होती. परंतु, यात्रेला हजारो लोक येतील असे काँग्रेसचे म्हणणे होते. त्यामुळे अखेर काँग्रेसने ठिकाणच बदलण्याचा निर्णय घेतला. आता ही यात्रा इंफाळपासून 34 किलोमीटर दूर असलेल्या थौबल येथून सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube