Manikrao Kokate Government Home Scam : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत. शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि १० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर आज (दि.17) जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच त्यांंना त्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंजली दिघोळे यांनी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करावे यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
कायद्यापुढे सर्व समान
कोकाटे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे याचा विचार करावा अशी विनंती कोकाटे यांच्या वकिलांतर्फे न्यायालयात करण्यात आली. त्यावेळी न्यायालायाने स्पष्ट केले की, न्यायालयापुढे सर्व लोकं समान आहेत मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो किंवा कोणत्याही व्यवसायामधला व्यक्ती असो असे सांगितले. तसेच स्वतः कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी शरण जावं किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे निर्देशही न्यायालायने दिले आहेत. त्यामुळे आता कोकाटे बंधू स्वतःहून शरण येतात की, त्यांना पोलिसांकडून अटक केली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल
नाशिक जिल्हा सत्र न्यायालायाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर या निकालावोरोधात कोकाटेंच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायाधीशांनी तातडीने सुनावणी ऐकण्यास नकार दिला असून, याप्रकरणावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ
कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. कोर्टाची प्रत आल्यानंतर आमदारकीबाबत निर्णय घेऊ असे विधीमंडळ सचिवालयाकडून सांगितले जात आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दुसरा मोठा दावा; ऑपरेशन सिंदूरबद्दल काय म्हणाले?
नेमकं प्रकरण काय?
कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांबाबत बनावट कागदपत्रे सादर करून त्या लाटल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना जामीन मंजूर झाल्याने कोकाटे यांचे मंत्रीपद तत्काळ धोक्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर काल जिल्हा सत्र न्यायालयानेही त्यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती.
1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.
कोकाटे यांची राजकीय कारकिर्द कशी?
1978 – एच पी टी कॉलेजच्या जी. एस. पदी
14 ऑगस्ट 1991 – युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
1992- जिल्हा परिषद सदस्य
1993- 1996 पंचायत समिती सभापती
1996 पासून आज तगायत 24 वर्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक
जिल्हा बँकेत तीनदा चेयरमन म्हणून नियुक्ती
1997 साली पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य
1997 – कृषी व पशु संवर्धन सभापती नाशिक जिल्हा परिषद
1999 साली पहिल्यांदा आमदार
2994 साली सलग दुसऱ्यांदा आमदार
1 जानेवारी 2008 साली सिन्नर दूध उत्पादक संघाची स्थापना व आज तगायत संचालक व चेयरमन
2008 09- महाराष्ट्र शिखर बँक संचालक
2009 साली सलग तिसऱ्यांदा आमदार
2014 विधानसभा निवडणुकीत पराभव
2019- ला अपक्ष लोकसभा निवडणूक लढवून पराभव
2019- विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आमदार.
सिन्नर विभागीय दूध संघाचे चेअरमन
2024- विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी
माणिकराव कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं?
अजित पवार यांनी आजच्या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्या, असे अजित पवार यांना सांगितले. तसेच माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं सांगा, असा थेट प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना विचारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कोकाटेंचे खातं कुणाला दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
