Download App

नगरकरांनो सावध राहा ! सलग चार दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

जिल्‍ह्याच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत विजांच्‍या कडकडाटांसह वादळीवारा व जोरदार पाऊस कोसळणार आहे.

  • Written By: Last Updated:

Rain Update: पावसाच्या मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात पुन्हा पावसाचे (Rain) आगमन झाले आहेत. तर आता येत्या तीन दिवसांत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्‍ह्याच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत विजांच्‍या कडकडाटांसह वादळीवारा व जोरदार पाऊस कोसळणार आहे. तसेच 26 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता आहे. हवामान विभागाने ( IMD) हा अलर्ट जारी केलाय. पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेय.


काय काळजी घ्याल

मेघगर्जनेच्‍या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी.


आपत्कालीन परिस्थिती संपर्क साधा

आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

follow us