Download App

Assembly Election Result : लाडक्या बहिणींची कमालच! उत्तर महाराष्ट्रात दिली एकहाती ‘सत्ता’…

राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.

Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election Result) झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. राज्यभरातून महायुतीच्या उमेदवारांना जनतेकडून भलतीच पसंती मिळाली असून महायुतीतील घटक पक्ष एकट्या भाजपला जवळपास 130 जागा मिळाल्या असून शिंदे गटाला 56 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीलाच 233 जागा मिळाल्याचं स्पष्ट झालंय. तर महाविकास आघाडीला 51 जागांवरच आघाडी मिळवण्यात यश मिळालंय. त्यामुळे आता राज्यात महायुतीचीच एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुतीला आशिर्वाद दिलायं. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात महायुतीचाच वरचष्मा असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ पुन्हा झाला ‘आण्णा’मय; चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा मोठा विजय

अहिल्यानगर शहर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा जवळपास 39 हजार मतांनी पराभव करुन दणदणीत विजय मिळवलायं. तर राहुरी मतदारसंघातून महायुतीचे शिवाजीराव कर्डिले यांनी विद्यमान असलेले प्राजक्त तनपुरे यांचा 18 हजार मतांनी पराभव केलायं. तर कोपरगाव मतदारसंघातून महायुतीचे आशुतोष काळे यांनी मोठं मताधिक्य घेत विजय मिळवलायं. तर अकोल्यात अजित पवार गटाचे किरण लहामटे यांनी महाविकास आघाडीच्या अमित भांगरेचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवलायं.

काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव :
संगमनेर मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, भाजपकडून अमोल खताळ यांना उमेदवार देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात रिंगणात होते. या निवडणुकीत खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 मते तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मते मिळाली आहेत. खताळ यांनी थोरात यांचा 10 हजार मतांनी पराभव केलायं.

शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून महायुतीच्या मोनिका राजळे यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली असून राजळे यांना 82 हजार 207 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे यांना 57 हजार 344 मते मिळाली आहेत. या लढतीत राजळे यांनी ढाकणेंचा 24 हजार मतांनी पराभव केलायं. तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना 54 हजार 762 मते मिळाली आहेत. यासोबतच श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं तर महायुतीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवार देण्यात आली. या लढतीत पाचपुतेंनी नागवडेंचा 34 हजार 958 मतांनी पराभव केला तर बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांना 60 हजार 860 मते मिळाली आहेत.

महायुती सुसाट; महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष नेतेपद’ मिळणार? माळवणकर रूल काय सांगतो…

खासदार निलेश लंकेंना धक्का, पत्नीचा पराभव…
पारनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून काशिनाथ दाते तर महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके मैदानात होत्या. राणी लंके यांना 1 लाख 359 मते मिळाली असून दाते यांना 1 लाख 2896 मते मिळाली आहेत. या अतितटीच्या लढतीत दाते यांनी लंकेंचा 2 हजार 500 मतांनी पराभव केलायं.

गिरीष महाजनांचा सलग सातव्यांदा विजय…
जामनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीष महाजन यांना 1 लाख 28 हजार 667 तर महाविकास आघाडीचे खोपडे दिलीप यांना 1 लाख 1 हजार 782 मते मिळाली आहेत. या लढतीत महाजनांनी खोपडेंचा 26 हजार मतांनी पराभव केला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गिरीश महाजन हे सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. गिरीश महाजन हे जवळपास 26000 मतांनी निवडून आले. जामनेर विधानसभा निवडणुकीत संकटमोचक आणि जनतेचे लोकप्रिय नेते गिरीश महाजन यांचा विजय जवळपास निश्चित होताच जामनेर शहरात जल्लोष साजरा करण्यात आला.

छगन भुजबळांची मनोज जरांगे फॅक्टरवर मात…
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाडण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले होते. एवढंच नाही तर छगन भुजबळ आणि जरांगे यांच्या जोरदार शाब्दिक चकमकही सुरु होती. अखेर छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव करीत मनोज जरांगे फॅक्टरवर मात केल्याचं स्पष्ट दिसून आलंय. तर देवळाली मतदारसंघातून महायुतीच्या सरोज आहिरे यांनी मविआचे योगेश घोलपांचा पराभव करत पुन्हा एकदा विधानसभेवर गेल्या आहेत. तसेच नांदगावमध्ये मविआचे गणेश धात्रक यांचा पराभव करत महायुतीचे सुहास कांदे विजयी झाले आहेत.

follow us