अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय दुपारी तीन वाजता काकडी येथे त्यांची भव्य सभाही होणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागले आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी शिर्डीकडे निघालेल्या बसवर शेवगाव तालुक्यातील मंगरूळ येथे दगडफेक करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही दगडफेक झाली असल्याचे सांगितले जाते. मोदी यांच्या कार्यक्रमासाठी गर्दी गोळा करण्याचे आवाहन पुढाऱ्यांना करण्यात आले होते. यासाठी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात आली. यावरून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. यातूनच ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी प्रशासनाकडून आणि भाजपाकडून नियोजन बैठका घेण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करत वाहतूक व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र शेवगाव तालुक्यातील मंगरूळ येथे बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे सदर बस पुन्हा शेवगाव आगारात आणण्यात आली. मराठा आरक्षणासाठी शासनाचा निषेध म्हणून ही दगडफेक झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
फडणवीसांनी शब्द पाळला; दिव्यांग वधूची गैरसोय करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला सरकारचा दणका
एका बाजूला दगडफेक झाल्याची घटना घडली असतानाच ठिकठिकाणी मोदी यांच्या कार्यक्रमावरती बहिष्कार घालण्यात आल्याचे दिसून येत आहे. जामखेडमधून शिर्डीला निघालेल्या बसेस अक्षरशः रिकाम्याच असल्याचे दिसून आले. यामुळे मोदींच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दुसरीकडे या सभेसाठी निघालेल्या भाजपचे नगरचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचेही वाहन अडविण्यात आले. मराठा समाजाकडून त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यामुळे आता मोदी यांच्या नगर दौऱ्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे गंभीर पडसाद दिसून येत आहेत.