Parth Pawar attends Sharad Pawar’s meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पक्षाची पुढील दिशा, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर जाणार आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबातही हालचालींना वेग आला असून, बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची महत्वाची बैठक सुरू आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या बैठकीला सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार हे कुटुंबातील प्रमुख सदस्य उपस्थित होते. राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही बैठक नेमकी कोणत्या दिशेने जाईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच, काही वेळापूर्वी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार गोविंद बागेत दाखल झाले आहेत.
भुजबळ, पटेलांना ‘त्या’ गोष्टीची कल्पना होती, जयंत पाटील यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवार किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कोणतीही राजकीय चर्चा न करता मुंबईत दाखल झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे पवार कुटुंबात अजूनही राजकीय मतभेद कायम आहेत का, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, पार्थ पवार यांच्या गोविंद बागेतील उपस्थितीमुळे कुटुंबातील दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा संवादाची दारे उघडत असल्याचं चित्र दिसत आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाचा उत्तराधिकारी, पक्षाची पुढील रणनीती, तसेच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार की स्वतंत्र वाटचाल करणार, यासंदर्भात प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवार कुटुंबातील अंतर्गत संवादातूनच राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरणार असल्याने, गोविंद बागेतील या बैठकीकडे केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालं आहे.
