बदली, छळ आणि धमक्या? पोलीस निरीक्षकाचा महासंचालकांना पत्र लिहून आत्महत्येचा इशारा

पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, सततच्या जातीवाचक अपमान आणि मानसिक छळामुळे कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा.

Untitled Design 84

Untitled Design 84

Police Inspector writes letter to Director General, warns of suicide : रायगड जिल्हा पोलीस दलात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, सततच्या जातीवाचक अपमान आणि मानसिक छळामुळे कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिल्याने हा प्रकार गंभीर वळणावर गेला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रमेश तडवी यांची 17 जानेवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथून रायगड जिल्ह्यात बदली झाली. 31 जानेवारी 2024 रोजी त्यांची महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी त्यांच्याविरोधात कथित कसुरी अहवाल सादर केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली. या निर्णयाविरोधात तडवी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये धाव घेतली.

MAT ने त्यांच्या बदलीला स्थगिती देत त्यांना पुन्हा महाड शहर पोलीस ठाण्यात रुजू करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानेही MAT चा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर 10 सप्टेंबर 2025 रोजी तडवी पुन्हा महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून रुजू झाले.

जातीवाचक अपमानाचे आरोप

रमेश तडवी यांनी आपल्या पात्रात नमूद केले आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजातील असल्यामुळे त्यांना वारंवार खालच्या जातीचा म्हणून हिनवले गेले. त्यांच्या मते उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा राहतो तेच बघतो, काही झाले तरी तुझी बदली करणार, अशी धमकी दिली.

तसेच महाड एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन हिंदुराव माने यांनी बाहेरच्या व्यक्तींसमोर जाणूनबुजून त्यांच्या जातीचा उल्लेख करून अपमान केल्याचा आरोप आहे. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी देखील जातीवरून अपमानास्पद वक्तव्ये करत, आम्ही बघून घेऊ अशा धमक्या दिल्याचा दावा तडवी यांनी केला आहे.

तरुणीवर अत्याचार अन् व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; माजी महापौर अभिषेक कळमकरांवर गुन्हा दाखल

जबाबदार अधिकाऱ्यांची नावे

तडवी यांनी आपल्या पात्रात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवे नमूद करत, स्वतःसह कुटुंबाच्या आत्महत्येला हेच जबाबदार असतील, असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, सध्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे (महाड), सविता गर्जे(श्रीवर्धन), पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे(एलसीबी, अलिबाग) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंदुराव माने (महाड एमआयडीसी) यांचा समावेश आहे.

बदनामी आणि मानसिक छळाचा आरोप

तडवी यांच्या मते, काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात बदनामीकारक माहिती देऊन सध्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची दिशाभूल केली. सततच्या दबावामुळे आणि मानसिक छळामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब तीव्र तणावाखाली असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

बेकायदेशीर अटकेसाठी दबाव?

महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वादातून दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी एका प्रकरणात भरत गिगावले यांचा मुलगा विकास गोगावले आरोपी असल्याचे नमूद आहे. तडवी यांच्या आरोपानुसार, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बनावट कारवाईचा दबाव टाकत तीन व्यक्तींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यास सांगितले. मात्र त्यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांना लक्ष करण्यात आले, वारंवार जातीवाचक अपमान करण्यात आला आणि बदनामी करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणामुळे रायगड पोलीस दलात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस महासंचालकांकडून या गंभीर आरोपांची दाखल घेतली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढील चौकशी आमी प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Exit mobile version