Pune Car Accident Case : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर खळबळजनक आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे.
अंजली दमानिया यांनी एक्स वर एक व्हिडिओ ट्विट करत पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल त्यांनी पुण्याच्या आयुक्तांना विचारला आहे आणि जर अजित पवारांनी फोन केला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अजित पवारांचा राजीनामा घेणार का? असा सवाल देखील त्यांनी या व्हीडीओमध्ये केला आहे.
या व्हिडिओमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या, चार दिवसांपूर्वी पोर्शे कार अपघात प्रकरणात मी एक ट्विट केले होते, त्या ट्विटमध्ये मी माझ्या मनातील शंका उपस्थित केल्या होत्या. त्या भीषण अपघातात दोन जणांचा मुत्यू झाला होता मात्र सर्व पोलीस यंत्रणा एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी काम करत आहे असे काहीसे चित्र होते. मात्र त्याच्या मागे कोण आहे का? अशी शंका माझ्या मनात होती. ती शंका होती म्हणून मी ते ट्विट डिलिट केली मात्र आता ती शंका खरी ठरत आहे का? असं मला वाटत आहे.
अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन केला अशा काही बातम्या मी पहिले आहे आणि हीच शंका माझ्या मनात होती. प्रत्येक गोष्टीवर बोलणारे अजित पवारांनी या प्रकरणात पहिले चार दिवस एकही शब्द बोलले नाही. मी सकाळी उठून काम करतो म्हणारे पुण्याचे पालकमंत्री अपघाताबद्दल एकही शब्द बोलले नाही, तर प्रत्येक वेळी आमदार सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. पण ही सारवासारव कोणासाठी चालली होती? असं अंजली दमानिया यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
अंजली दमानिया पुढे म्हणाले, जर अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना या प्रकरणात फोन केला आहे की नाही याचा पुण्याच्या आयुक्तांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. जर अजित पवारांनी फोन केला नसेल तर उत्तम आणि जर केला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी आणि फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी. अशी मागणी त्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये केली आहे.
पुणे अपघात प्रकरणात अटकसत्र सुरूच; ससूनच्या डॉक्टरांनंतर आता शिपायालाही ठोकल्या बेड्या
पोर्शे कार अपघात प्रकरणात काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती.