मुख्यमंत्रीपदी ‘एकनाथ शिंदे’ कोणाला नको होते? पवारांचा खुलासा… ठाकरे व्हिलन?
2019 मधील सत्तानाट्यादरम्यानचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. यात खरंच भाजपने (BJP) शिवसेनेला (ShivSena) मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. दिला होता तर तो शब्द पाळला का नाही? दिला नसेल तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एवढे का ताणून धरले?खरंच शरद पवार यांची भाजपसोबत जाण्याची तयारी होती का? होती तर माघार का घेतली? अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सकाळच्या शपथविधीला पवारांचा आशीर्वाद होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनता मागच्या पाच वर्षांपासून शोधत आहेत.
यापैकीच आणखी काही प्रश्न म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्येही मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. पण अचानक उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कसे आले? उद्धव ठाकरे यांनाच स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते का? त्यांचा शिंदेंच्या नावाला विरोध होता का? शरद पवार यांनी शिंदेंना थांबवून ठाकरेंना पुढे आणले का? याही प्रश्नांचा उहापोह होणे बाकी आहे. अशात “एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चाच महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली नव्हती”, असा दावा करत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. पवारांच्या या दाव्याने उद्धव ठाकरे जाहीररित्या व्हिलन बनले असल्याचे बोलले जाते.
नेमके काय आहे हे दावे-प्रतिदावे आणि शिंदे मुख्यमंत्रीपदी कोणाला नको होते?
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा आपल्याला मुख्यमंत्री होण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता असे सांगितले आहे. पण देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे अन्य नेते असतील. यांनी कायमच उद्धव ठाकरे यांनाच स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांचे प्लॅनिंग आधीच ठरले होते, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला असा दावा केला आहे. शिंदेही कधी तरी हीच रीघ ओढताना दिसून येतात. कधी कधी एकनाथ शिंदे हे ज्युनिअर असल्याने काँग्रेस आणि शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, असाही दावा केला जातो. थोडक्यात एकनाथ शिंदे यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी विरोध केल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सांगितले जाते.
आम्हीही देशाचे नागरिक! देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क
पण याच बाबत आता शरद पवार यांनी ‘लोकसत्ता वृत्तपत्रा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केले आहे. पवार म्हणाले, :2019 साली महाविकास आघाडीच्या प्रयोगात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचे नावच आमच्यापर्यंत आले नाही. आमच्या बैठकीत नेतृत्व कोणी करायचे असा प्रश्न आला. तेव्हा संपूर्ण बैठकीत शांतता होती. त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या शेजारी बसले होते.तेव्हा मी त्याचा हात धरला आणि उंचावून वर केला. म्हंटले, ठाकरे नेतृ्त्व करतील. त्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून दादही दिली”. तेव्हा शिंदे यांचे नाव चर्चेत आहे, शिवसेनेत त्यांच्या नावाबाबत अंतर्गत चर्चा झाली होती. त्याची माहितीही आम्हाला नंतर मिळाली. त्यांच्या नावाला आमची काहीच हरकत नव्हती. मात्र शिवसेनेनेच त्याबाबत पुढाकार घेतला नाही, असा दावा पवार यांनी केला.
…तर आम्ही न्यायालयात जाऊ; मतदान केंद्रावरील घटनांवरून उद्धव ठाकरे कडाडले
पवारांच्या या दाव्याला कॉर्नर करण्यासाठी संजय राऊत यांनी हे प्रकरण भाजप आणि अजित पवार यांच्या गोटात ढकलून दिले. “2019 मध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र होण्यापूर्वी भाजपच्या वरिष्ठांनी “जे आता मंत्रिमंडळात आहेत त्यांनी निरोप पाठवला. दिल्लीचा निर्णय काय होईल तो होईल, पण आम्हाला मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे चालणार नाहीत. फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांची हीच भूमिका होती,” असा दावा संजय राऊत यांनी केला. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर नको अशी भूमिका अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांनीही घेतली होती. आम्ही सीनियर असून ज्यूनियरच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती, असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला. पण आता एकनाथ शिंदे भाजपच्याच पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत. तर पवार यांनी नावच आले नसल्याचे सांगून ठाकरेंना संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांनीच शिंदेंपासून मुख्यमंत्रीपदाची संधी हिरावून घेतली का? असा सवाल विचारला जात आहे