Ramdas Kadam’s sensational claim : ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याचा चर्चांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे गटाचे केवळ सहा नव्हे, तर सात खासदार पक्ष सोडण्याच्या भूमिकेत होते आणि त्यापैकी एका खासदाराने मंत्रिपदाची मागणी देखील केली होती.
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली. बाळासाहेब कोणतेही पद न घेता पक्ष चालवत होते, कार्यकर्त्यांना संधी देत होते आणि त्यांच्या एका शब्दासाठी शिवसैनिक जीव देण्यास तयार असायचे, असे सांगत त्यांनी आजच्या परिस्थितीची तुलना केली.
बाळासाहेबांचा मार्ग सोडल्याने पक्ष कमकुवत झाला
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीचे अनीकरण केले नाही, त्यामुळे शिवसेना राज्यातील क्रमांक एकचा पक्ष होऊ शकला नाही, अशी टीका कदम यांनी केली. काँग्रेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक ज्येष्ठ नेते बाजूला पडले आणि पक्षाची मूळ विचारधारा कमकुवत झाली, असे देखील ते म्हणाले. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत, टायगर कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी नेतृत्व उभं केलं आणि शिवसेना वाचवली, असे म्हटले.
लोक पक्ष का सोडतात, याचे आत्मपरीक्षण करा
रामदास कदम यांनी पक्षातील फुटीमागील कारणांवर भाष्य करताना सांगितले की, अनेक आमदार आणि खासदारांनी नेतृत्वाकडे वारंवार संवाद साधण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे लोक पक्ष सोडत आहेत. याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी दावा केला की, ठाकरे गटातील सातव्या खासदाराचीही सही एका प्रस्तावावर होती आणि तो व्यक्ती मंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त करत होता. “उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही,” असा सल्लाही त्यांनी दिला.
सहा खासदारांच्या निर्णयामागे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरील विश्वास; उदय सामंतांनी सांगितली ऑपरेशन टायगरची कहाणी
फक्त आदित्यसाठी पक्षाची वाट लावली
कदम यांनी पुढे बोलताना पक्षातील निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फक्त आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी पक्षाचे नुकसान झाले. आम्ही त्यांचा आदर केला, पण पुढे काय घडेल याची कल्पना नव्हती, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नेतृत्वावर निशाणा साधला. त्यांच्या मते, बाळासाहेब ठाकरे सर्व नेत्यांची मते ऐकून निर्णय घ्यायचे; मात्र आज पक्षात तशी संवादाची संस्कृती राहिलेली नाही. याच कारणामुळे अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी पक्षापासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील 25 नगरसेवक संपर्कात
रामदास कदम यांनी आणखी एक मोठा राजकीय दावा करत सांगितले की, मुंबईतील सुमारे 25 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. तसेच आगामी काळात आणखी आमदारही ठाकरे गट सोडू शकतात, असा दावा त्यांनी केला. 2029 पर्यंत सध्याचे अनेक आमदार ठाकरे गटात राहतील की नाही, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
कितीही कारणे द्या,सत्य एकच तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे… ओमराजेंसह सहाही खासदारांवर आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
संजय राऊतांवरही जोरदार टीका
संजय राऊत यांच्यावर टीका करताना कदम म्हणाले की, पक्षफुटी आणि वेगळ्या गटांच्या मान्यतेसंदर्भातील घटनात्मक आणि संसदीय प्रक्रिया त्यांना नीट माहिती नाही. सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेऊन शिवीगाळ केल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे गटातील खासदार आणि नेत्यांच्या संभाव्य नाराजीबाबत रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, ‘ऑपरेशन टायगर’नंतरची राजकीय घडामोडी आणखी वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
