सहा खासदारांच्या निर्णयामागे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरील विश्वास; उदय सामंतांनी सांगितली ऑपरेशन टायगरची कहाणी
शिवसेनेची ताकद वाढल्यास केंद्रात वाढीव मंत्रिपदाची मागणी देखील केली जाईल, असे स्पष्ट संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत.
Uday Samant told the story of Operation Tiger : दिल्लीतून सूत्रे हलवून राबवण्यात आलेल्या कथित ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याचा चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात बोलताना सामंत यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा करत, शिवसेनेची ताकद वाढल्यास केंद्रात वाढीव मंत्रिपदाची मागणी देखील केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
उदय सामंत म्हणाले की, ऑपरेशन टायगरचे खरे शिल्पकार कोणी बाहेरचे नसून ते स्वतः ते सहा खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल. काळ ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार पोहोचले नाहीत, यावरून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे दिसते, असे ते म्हणाले.
ठाकरे गटाकडून वापरल्या जाणाऱ्या आक्रमक भाषेवर टीका करताना सामंत म्हणाले की, कोथळा काढू, तुडवू अशा घोषणा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ठीक असतील, पण त्यातून काहीही साध्य होत नाही. पत्रकारांना देखील लक्ष्य करणाऱ्या वक्तव्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 2022 च्या शिवसेनेतील बंडाची आठवण करून देताना सामंत यांनी दावा केला की, एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा महायुतीकडे परत जाण्याची विनंती केली होती. मात्र काँग्रेसची साथ सोडण्यास नेतृत्व तयार नव्हते आणि चुकीच्या सल्ल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली, असा आरोप त्यांनी केला.
ना निधी, ना सत्ता, मग विकासकामे कशी करायची?; मतदारसंघातील अडचणी मांडताना खासदार ओमराजे निंबाळकरांची खंत
सहा खासदारांच्या निर्णयावर जनमताचा अपमान असल्याचा आरोप करणाऱ्यांना देखील सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. 2019 मध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेससोबत जाणे हा जनादेशाचा अपमान नव्हता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षांतर सुरूच राहतील आणि आगामी काळात काँग्रेस तसेच ठाकरे गटातील अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा देखील त्यांनी केला.
फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना सामंत म्हणाले की, ज्या पक्षांच्या नेतृत्वावर लोकप्रतिनिधींना विश्वास उरत नाही, त्या पक्षांमध्ये फूट पडते. 2022 मध्ये आमच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला, मात्र 2024 मध्ये मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, असे त्यांनी सांगितले. सहा खासदारांच्या संभाव्य प्रवेशानंतर महायुतीत मोठा भाऊ-छोटा भाऊ वाद निर्माण होईल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे देखील परिपकव नेते असून त्यांच्यात उत्तम समन्वय आहे. त्यामुळे खासदारांची संख्या वाढली तरी महायुतीच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी म्हटले.
महिला आरक्षण विधेयकही ऑपरेशन टायगरचे टायमिंग जोडले जात असल्याच्या चर्चा देखील त्यांनी फेटाळून लावल्या. हा केवळ योगायोग आहे, असे ते म्हणाले. मात्र खासदारांची संख्या वाढल्यास केंद्रात शिवसेनेचा वाट वाढवण्याची आणि अतिरिक्त मंत्रिपदाची मागणी करण्याचे संकेत त्यांनी दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य भूमिकेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, यापूर्वी देखील संधी असूनही श्रीकांत शिंदे यांनी स्वतः मंत्री होण्याऐवजी पक्षातील इतर नेत्याला संधी देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पक्षहिताला प्राधान्य देण्याची परंपरा शिवसेनेत कायम आहे.
आगे आगे देखो होता है क्या, 13 ते 14 आमदार फुटणार असल्याच्या संतोष बंगारांच्या दाव्याने खळबळ
राज ठाकरे आणि मनसेबाबत देखील त्यांनी भाष्य केले. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास आनंदच होईल, असे ते म्हणाले. ठाकरे परिवार पुन्हा एकत्र आल्याचा आनंद असल्याचे सांगतानाच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा गैरसमज करून देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
संजय राऊत यांच्याबाबत बोलताना सामानात म्हणाले की, गेली चार वर्षे त्यांनी आमच्यावर टीका केली, मात्र ते आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली होती. आज ते सहा खासदार आमच्या मंचावर दिसले तर आम्हाला आनंदच होईल, असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. एकूणच, ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचा दावा करत उदय सामंत यांनी आगामी काळात शिवसेनेची ताडताड आणखी वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत.