आगे आगे देखो होता है क्या, 13 ते 14 आमदार फुटणार असल्याच्या संतोष बंगारांच्या दाव्याने खळबळ
आमदार संतोष बांगर यांनी आणखी एक मोठा दावा करत ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
Santosh Bangar’s claim causes a stir : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठा धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुचर्चित ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा रंगत असतानाच ठाकरे गटाचे सहा खासदार पक्षापासून दूर गेल्याचे संकेत मिळत आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या शिवसेना उबठा पक्षाच्या संसदीय बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे सर्व खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असतानाच शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आणखी एक मोठा दावा करत ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
या सर्व राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संतोष बांगर म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वीच मी याबाबत संकेत दिले होते. शिंदे साहेबांच्या नेत्रित्वावर विश्वास ठेऊन देखील सहाही खासदारांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जशी माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही हिंगोलीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे स्वागत देखील केले. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळणार असून शिवसेना आणखी मजबूत होईल. यावेळी महाराष्ट्रात देखील ठाकरे गटातील आमदार शिंदे गटात प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता बांगर यांनी थेट उत्तर देण्याऐवजी आगे आगे देखो होता हैं क्या, असे म्हणत मोठे संकेत दिले. त्यानंतर त्यांनी दावा केला की, तुम्ही जे बोलत आहेत ते देखील झाल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.
आमदार संतोष बांगर यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा शिंदे साहेबांना मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून हे स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षांपासून रखडलेला हिंगोली जिल्ह्याचा विकास आता नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त केला.
ना निधी, ना सत्ता, मग विकासकामे कशी करायची?; मतदारसंघातील अडचणी मांडताना खासदार ओमराजे निंबाळकरांची खंत
यादरम्यान, ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभेतून निवडून आलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव बंडखोर खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी हिंगोली शहरात त्यांचे स्वागत करणारे मोठमोठे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नांदेड नाक परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतल्याबद्दल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे अभिनंदन असा मजकूर लिहिण्यात आला असून हे बॅनर आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरे गटातून बाहेर पडल्याचा दावा ज्या खासदारांबाबत केला जात आहे त्यामध्ये परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे हे अद्याप उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे मानले जात आहे.
सहा खासदारांच्या कथित बंडानंतर आता आमदारांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. संतोष बांगर यांनी केलेल्या 13 ते 14 आमदारांच्या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार का आणि शिंदे यांचे ऑपरेशन टायगर आणखी किती मोठा परिणाम घडवणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.