Download App

कर्जतच्या मेडिकल कॉलेजसाठी रोहितदादांची थेट फडणवीसांकडे फिल्डिंग; शिंदेंना भारी पडणार?

Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपाठोपाठ आमदार रोहित पवार

Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपाठोपाठ आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी काल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. आज (बुधवार) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि चोंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याबाबत त्यांचे आभार मानले आणि हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात करण्याची मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी अहिल्यानगर शहराच्या आसपास अशा जागेचा शोध घेण्यात आला, परंतु पुरेशी आणि सर्व दृष्टीने सुयोग्य अशी जागा उपलब्ध झालेली नाही. वास्तविक अहिल्यानगर शहरात विळद घाटात विखे पाटील फौंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय आणि शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय आहे तर इतरही मोठमोठी खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांची कोणतीही गैरसोय होत नाही. त्यातच नव्याने मंजुर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही अहिल्यानगर शहराच्या आसपास झाले तर वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी होतील आणि जिल्ह्यातील लांबच्या रुग्णांनाही उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागेल.

त्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या जवळ होण्याऐवजी कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे या लगतच्या जिल्ह्यातील गावांना होणार आहे. शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी पुरेशी जागा कर्जत-जामखेड मतदारसंघात उपलब्ध होऊ शकते, ही बाब आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना त्यांना सांगितली.

तसेच याची घोषणा 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी करण्याची विनंतीही केली. याबाबत राज्याचे अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी आमदार रोहित पवार हे गेल्या 2022 पासून पाठपुरावा करत आहेत आणि आता वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा होताच ते आपल्या मतदारसंघात कसे होईल यासाठी त्यांनी पर्ण ताकद लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी मांडलेले मुद्द्यांचा विचार केला तर याबाबत कुणाचेही दुमत होणार नाही. कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्याला तर होणार आहेच पण शेजारचे बीड, पुणे, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातील सीमेवरच्या गावांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या मागणीवर राज्य सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते, याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नको त्या व्यक्तीसोबत चॅट, फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? राजेंद्र हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद

‘‘चोंडीमध्ये (ता. जामखेड) झालेल्या कॅबिनेट बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानले आणि हे महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात करण्याची विनंती केली. याबाबत अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचं त्यांनी आश्वासित केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी ३१ मे रोजी याबाबतची घोषणा करण्याची विनंतीही मुख्यमंत्री महोदायांना केली. याबाबत ते नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, अशी आम्हा कर्जत-जामखेडकरांना अपेक्षा आहे.’’ : रोहित पवार, (आमदार, कर्जत-जामखेड)

follow us