अमरावती : “संभाजी भिडे याच्यामागे सत्ताधारी आहेत. याच्यामागे हेच लोक असून त्यांचाच हात आहे, नाहीतर काल त्यांचा खासदार अनिल बोंडे कशासाठी आंदोलनात उतरला असता? असं म्हणतं काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी थेट आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना “तुमचाही दाभोळकर करु” अशी धमकी देण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार ठाकूर बोलत होत्या. (Sambhaji Bhide’s brain is ruling party Yashomati Thakur directly alligations on BJP after death threat)
यशोमती ठाकूर म्हणाल्या, आता या लोकांनी धमकी देणं सुरु केलं आहे. काल पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी दिली. आज मला धमकी दिली. दाभोळकरांसारखी गत करु, असं म्हणतं आहेत. तुम्ही आम्हाला मारुन टाकणार असाल तर टाका, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. पण आम्ही याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. याच्यामागे सत्ताधारी आहे. याच्यामागे हेच लोक असून त्यांचाच हात आहे, नाहीतर काल त्यांचा खासदार अनिल बोंडे कशासाठी आंदोलनात उतरला असता?
काय बोलली मी? राष्ट्रपितांना ज्या +—+– घाणेरड्या शब्दात बोलल्या त्यांना -+-+- म्हटलं. मी काय चूक केली? तुम्ही महात्मा गांधी यांना काही बोलाल आणि आम्ही ते सहन करायचं? महात्मा ज्योतिबांना तुम्ही काही बोलत आम्ही ते सहन करायचं? पंडित जवाहरलाल नेहरूंना तुम्ही काही बोलत आम्ही ते सहन करायचं? पण एक आहे, माझ्या जीवाला काही झालं तर याला जबाबदार हे गृहमंत्रालय आणि सरकार राहिल हे नक्की, असंही ठाकूर त्या म्हणाल्या.
संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच यशोमती ठाकूर यांनाही ट्विटरवरुन धमकी देण्यात आली आहे. “दाभोळकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला” असं म्हणतं ठाकूर यांना “तुमचाही दाभोळकर करु” इशारा देत धमकी देण्यात आली आहे. एका पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये कैलास सुर्यवंशी नावाच्या युजरने ही धमकी दिली आहे. या प्रकरणी आता अमरावती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.