सोलापुरात राजकीय ‘समाधान’ नेमकं कोणाचं? काका बबनरावांचा भाजप प्रवेश; आमदार समाधान अवताडे अंधारात का?

सोलापुरात भाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. पूर्वी भाजप आमदारावर अवलंबून होता, आता आमदारालाच भाजपवर अवलंबून ठेवलं जातंय.

Solapur Political Buzz! Babanrao Avtade Joins BJP

Solapur Political Buzz! Babanrao Avtade Joins BJP: सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये शनिवारी एकाच कार्यक्रमात दोन गोंधळ सोलापूरसह राज्यातल्या जनतेनं पाहिले आहेत. एक गोंधळ भोजनाच्या पंक्तीवेळी आणि दुसरा गोंधळ राजकारणातला होता. मात्र दुसरा गोंधळ एवढा मोठा होता की भाजपने स्वतःच्याच आमदाराला धक्क्याला लावलं की काय असंच कोणालाैही वाटावं!

सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप आमदार समाधान आवताडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. काका भाजपमध्ये दाखल होत असताना पुतणे आमदार मात्र कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमकं सोलापुरात घडलं तरी काय?

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि तब्बल ३५ वर्षे संचालक असलेले ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा अवताडे, ५ नगरसेवक, बाजार समितीचे सभापती, खरेदी-विक्री संघाचे सभापती, १० गावचे सरपंच, ४० ग्रामपंचायत सदस्य आणि तब्बल ७० सोसायट्यांचे पदाधिकारी, असे एकूण २०० जणांनी कमळ हाती घेतलं.

पण या सगळ्या मेगा प्रवेश सोहळ्याला एक व्यक्तीच नव्हती. ती व्यक्ती म्हणजे मंगळवेढा-पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे! स्वतःच्या काकांचा पक्षप्रवेश होतोय आणि पुतण्या आमदारच गैरहजर… यामागचं कारण काय?

मंगळवेढा तालुक्यात सहकार म्हणजे बबनराव अवताडे. जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या सगळ्यावर गेली ३५ वर्षे त्यांचा एकहाती प्रभाव आहे. त्यांनी कधीही थेट भाजप किंवा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली नाही. त्यांनी स्वतःची तीर्थक्षेत्र विकास आघाडी काढली आणि त्याच आघाडीच्या माध्यमातून त्यांनी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा. सुनंदा अवताडे या त्याच आघाडीतून नगराध्यक्षा बनल्या.

वादाची सुरुवात कुठून झाली?

समाधान अवताडे हे बबनरावांचे सख्खे पुतणे आहेत. पण २०२१ मध्ये जेव्हा पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक झाली, तेव्हा बबनराव यांचा मुलगा सिद्धेश्वर अवताडे याने आपल्याच चुलत भावाच्या, म्हणजे समाधान आवताडे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत समाधान आवताडे जिंकले खरे, पण घरात कायमची फूट पडली.

एप्रिल २०२६ मध्ये आणखी एक धक्का

बबनराव यांचे एकेकाळचे सहकारी भगीरथ भालके आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की आता बबनराव अवताडे गट सुद्धा शिंदे गटातच जाणार. कारण नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळवणे, दुष्काळावर मात करणे यासाठी सत्तेची गरज होती.

इथेच भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी मास्टरस्ट्रोक मारला. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सोलापुरात आणलं. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीच्या नावाखाली हॉटेल बालाजी सरोवरमध्ये बैठक लावली आणि त्याच बैठकीत बबनराव गटाचा भाजप प्रवेश घडवून आणला. हा शिंदे गटाला दिलेला सर्वात मोठा खो मानला जातोय.

खरा गेम काय?

यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेची वार्षिक उलाढाल ५ हजार कोटींच्या घरात आहे. या बँकेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यात होणार आहे. नुकतीच मुंबई हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे की जे लोक सलग १० वर्षे संचालक राहिले आहेत, ते आता निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे बबनराव स्वतः अपात्र ठरले आहेत. म्हणून त्यांना आता त्यांचा मुलगा सिद्धेश्वरला बँकेत संचालक म्हणून बसवायचं आहे. आणि गंमत म्हणजे त्याच जागेसाठी आमदार समाधान आवताडे सुद्धा इच्छुक आहेत. म्हणजे आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढाई होणार आहे.

आणि दुसरं कारण म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. बबनराव यांच्यासोबत ७० सोसायट्या आल्या म्हणजे ७० गावांची यंत्रणा भाजपला आयती मिळाली. या मतदारसंघात सोसायट्यांचे मतदार खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष स्वतः सोलापुरात आले होते.

म्हणूनच आमदार समाधान आवताडे यांना या कार्यक्रमापासून लांब ठेवलं गेलं. संदेश स्पष्ट आहे. सोलापुरात भाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. पूर्वी भाजप आमदारावर अवलंबून होता, आता आमदारालाच भाजपवर अवलंबून ठेवलं जातंय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरची पूर्ण स्टाईल बदलून टाकली आहे. भोजनाच्या पंक्तीतला गोंधळ हा फक्त ट्रेलर होता. खरा सिनेमा अजून बाकी आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us