“दाभोलकर असाच ओरडत होता, एक दिवस…” : संभाजी भिडे प्रकरणात यशोमती ठाकूरांनाही धमकी

“दाभोलकर असाच ओरडत होता, एक दिवस…” : संभाजी भिडे प्रकरणात यशोमती ठाकूरांनाही धमकी

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका काँग्रेस नेत्याला धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ट्विटरवरुन धमकी देण्यात आली आहे. “दाभोलकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला” असं म्हणतं ठाकूर यांना इशारा देत धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता अमरावती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Congress leader and former minister Yashomati Thakur has been threatened on Twitter in the Sambhaji Bhide case)

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर काँग्रेसच्यावतीने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच नंतर रविवारी (30 जुलै) दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देण्यात आली. ईमेलवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अद्याप हे प्रकरण ताजे असतानाच आमदार यशोमती ठाकून यांनाही त्यांच्या ट्विटर पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये धमकी देण्यात आली आहे. आज (31 जुलै) ठाकूर या संभाजी भिडेंविरोधात आंदोलन करणार होत्या. त्यापूर्वीच त्यांना धमकी दिली आहे.

काय म्हंटले होते यशोमती ठाकूर यांनी?

काल माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या, मला पोलिसांचा आश्चर्य वाटतं आम्ही संभाजी भिडे म्हणजे मनोहर कुलकर्णी याच्याबद्दल तक्रार करायला आलो होतो. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही दखलपात्र गुन्हा दाखल करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांनी तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपिताचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तर इथेच आम्हाला अरेरावी सुरू झाली होती. त्यावर आम्हीही म्हटलं आता करा बरं अटक आम्हाला.

म्हणजे आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत आणि त्या +-++–, त्या नालायक माणसाला, ज्याला तडीपार केलं पाहिजे या देशापासून, त्याला उग्र भाषण देण्याची मुभा आहे? हे कोणतं शासन चालवणं आणि राज्य चालवणं आलं? आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आम्ही उद्याच म्हणजे रविवारी संध्याकाळपर्यंत जरा शांत बसतो. तोपर्यंत जर याच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, देशद्रोह्याला अटक झाली नाही तर आम्ही मग आंदोलन छेडू आणि मग आम्हाला तुम्ही थांबवू शकत नाही.

यानंतरच एका पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये कैलास सुर्यवंशी नावाच्या युजरने यशोमती ठाकूर यांना दाभोळकर करु अशी धमकी दिली आहे. “दाभोलकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला, +x+-+x कोण आहे बाई स्पष्ट करा” असं म्हंटलं आहे. या प्रकरणी आता अमरावती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube