Sanjay Raut On Prithviraj Chavan : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 5 ते 6 खासदरा अस्वस्थ असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकेत असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अस्वस्थ होण्याचं कारण काय? शरद पवारांनी गावोगावी फिरून खासदार निवडून आणले. त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कोणतंच कारण नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, शिवसेनेचे सहा खासदार फोडले गेले. “अस्वस्थ” वगैरे गोष्टी आम्ही मानत नाही. तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आला आहात, मग अस्वस्थ होण्याचं कारण काय? तुम्ही मशाल चिन्ह स्वीकारलं, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्याच नेतृत्वाखाली निवडून आलात. त्याचप्रमाणे अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतर तुम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढलात.
शरद पवारांनी गावोगावी फिरून खासदार निवडून आणले. त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कोणतंच कारण नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोदी-शहा यांच्या विरोधातील मतदारांनी निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का व्हायचं? कोणाला घाबरताय? पण कोणीही अस्वस्थ नाही. मोदी, शहा आणि इतर काही घटक दबावाचं राजकारण करतात आणि अशा प्रकारे लोकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतात असं संजय राऊत म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी निश्चितच शरद पवार (Sharad Pawar) साहेबांपर्यंत पोहोचवली असेल. आमचे सहा खासदार का गेले? ते कशासाठी अस्वस्थ होते? हे कसला विकास करत आहेत? 100 कोटी रुपये दिले तरी हे विकास करू शकत नाहीत. नरेंद्र मोदी अजून वाराणसीचाही अपेक्षित विकास करू शकलेले नाहीत. नागपुरात जाऊन पाहा, काय – विकास झाला आहे. नांदेडमध्ये काल पूल कोसळला, मिसिंग लिंक कोसळली. राज्यभर रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. हा कसला विकास? मग कोणत्या विकासासाठी अस्वस्थ व्हायचं? 2029 मध्ये इंडिया आघाडी सत्तेत येईल आणि महाराष्ट्रातील हे भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकू, हा आमचा आत्मविश्वास आहे. आम्ही विरोधी पक्षात असतानाही तुम्ही आमच्याकडे आला होता. आम्ही सत्तेत नव्हतो, हे तुम्हाला माहिती होतं असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले.
आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि माझी चर्चा झाली. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, एवढंच.ठीक आहे, त्यांच्या मनात कद्रूपणा आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडून भाजपसोबत जाणं हा आमच्या भांडणाचा विषय नाही. त्यांनी अमित शहा यांच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर दरोडा टाकला, हा आमच्या भांडणाचा मुद्दा आहे. अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष सोडला, हा भांडणाचा मुद्दा नाही. पण शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहा यांच्या मदतीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. जशी राम मंदिराच्या नावावर लूट झाली, तशीच हीही लूट झाली, हा आमच्या वादाचा विषय आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे झालात? त्या पक्षाचे आई-बाप तुम्ही कसे काय झालात? शरद पवारांच्या पक्षाचे आई-बाप पार्थ पवार, जय पवार, सुनीता पवार, सुनील तटकरे किंवा प्रफुल पटेल होऊ शकतात का? बाप अजून जिवंत आहे, तो सिल्व्हर ओक आणि वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बसलेला आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांच्या मनात स्वाभिमानाची एक ठिणगी तरी असायला हवी. आमच्यात ती आहे. शरद पवार हे आमचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात कायम श्रद्धा आणि आदर आहे आणि तो कायम राहील. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. काल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या.
खासदारांनंतर आता 12 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ? मिळणार 5 कोटींचा निधी
एकनाथ शिंदे आम्हाला कद्रूपणाबद्दल काय सांगतात? त्यांच्या मनात किती कद्रूपणा भरलेला आहे, तो बाहेर काढला तर काय होईल? शरद पवारांसारखा नेता एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. आमच्या दृष्टीने एखादा गद्दार त्यांना भेटला, तर त्या गद्दाराची प्रतिष्ठा वाढते. एवढंच मत मी व्यक्त केलं असेही या भेटीवर खासदार संजय राऊत म्हणाले.
