Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याबाबत सूतोवाच केले. त्याचा तपशील उद्या जाहीर करण्यात येणार आहे.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील सुमारे 12,500 शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील 48 विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील 902 विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना 706 विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले.
यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर हा कार्यक्रम आधारित असेल. विकसित महाराष्ट्र मुद्यांवर 2029, 2035 आणि 2047 अशा तीन टप्प्यांत विभागाचे धोरण काय असेल याबाबत परिमाण निश्चित करण्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले. शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतून प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले. आता नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम आखला आहे.
मोठी बातमी, जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग दाखविल्याबद्दल सर्व मंत्री आणि सचिव यांचे आभार मानले.