ठाणे : आज मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत. राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गुढीपाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असा, इशारा दिला होता. त्यामुळं आज पाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी डोंबिवलीच्या (Dombiwali)मनसे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आहे. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसेच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीचे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच आज मनसेचा गुढीपाडवा आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मनसे कार्यालयात आगमन होताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केलं.
आज मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, सालाबादप्रमाणे आज याठिकाणी कार्यक्रम होता. आज पहिल्यांदाच गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. ते आपल्या ठाणे जिल्ह्यातलेच आहेत.
अशावेळी आमचे राजकीय गणितं काहीही असतील तरीही एक आपली संस्कृती म्हणून मी त्यांना विनंती केली की, आमचं ऑफिस जवळच आहे. येता का? त्यानंतर मुख्यमंत्री लगेच आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. त्यामुळं त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. ते म्हणाले की, कोणीही बाराही महिने 24 तास राजकारण करत नाही. काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्याही असतात, सामाजिक सलोख्याच्या पण असतात. त्यामुळं मुख्यमंत्री आले , त्यांचे आभारच मानतो असेही यावेळी आमदार राजू पाटील म्हणाले.
त्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि मनसेची मनं जुळली का? असा प्रश्न केला. त्यावर राजू पाटील म्हणाले की, मनं जुळली काय झालं? ते आमचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे बघतील, हा काही आमचा विषय नाही, असं म्हणत राजू पाटलांनी विषय त्याच ठिकाणी संपवला.
पाटील म्हणाले की, एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आम्हालाही चांगला स्कोप आहे. लोकं आम्हाला समोर येऊन सांगतात की, आम्ही कंटाळलोय, तुम्ही पुढे या. आणि म्हणूनच राज ठाकरे तरुणांना आणि जनतेला आव्हान करतात की, तुम्ही राजकारणात या. लोक पर्याय शोधतात आणि अशा वेळेस युती-आघाडी हा आमचा विषय नाही. तो राज ठाकरे घेतील असं पुन्हा एकदा राजू पाटलांनी सांगितलं आहे.