Sanjay Shirsath on Eknath Shinde Decision : महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. (Sanjay Shirsath) पण त्यानंतरही भाजप आम्हाला गृह खातं देण्यास विरोध का करत आहे हे समजत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदावर दावा सांगितला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं स्पष्ट केलं. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे. पण शिवसेनेने गृहमंत्रीपदासारख्या महत्त्वाच्या खात्याची मागणी केल्यामुळे महायुतीच्या सत्तेचे घोडे अडले आहे. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेला राज्याचे गृहमंत्रीपद हवे असल्याचे ठणकावून सांगितलं. तसंच, एकनाथ शिंदे आज सायंकाळपर्यंत उपमुख्यमंत्रीपदावरील आपली भूमिका स्पष्ट करतील असा अंदाजही व्यक्त केला.
शिंदे केंद्रात जाणार नाहीत
संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत हे निश्चित आहे. त्यांची राज्यात कॉमन मॅन म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्लीला जाणं शक्य नाही. ते उपमुख्यमंत्रीपदावरील आपली भूमिका आज सायंकाळपर्यंत स्पष्ट करतील असा अंदाज आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालं नाही. दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत खातेवाटपावर प्राथमिक चर्चा झाली. त्यात शिवसेनेने गृह खात्याचा आग्रह धरला आहे.
शिवसेना गृहखाते सांभाळेल
ते पुढे म्हणाले, महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आम्हाला खाती देताना निश्चितच विचार करावा लागेल. शिवसेनेला गृह खाते देण्यास भाजपचा का विरोध आहे? याची मला कल्पना नाही. पण गृहखाते शिवसेनेकडेच असावे अशी आमची मागणी आहे. मागच्या काही काळात राज्यात दंगली झाल्या. आजही आंदोलने सुरू आहेत. विशेषतः मराठा व ओबीसींतील वाद हाताळण्यासाठी पूर्ण कसब लावावे लागणार आहेत. महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी गृह खात्याचा कारभार शिवसेनेकडे असला पाहिजे.
एकनाथ शिंदे फकीर माणूस
पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात दुय्यम भूमिका स्वीकारणार का? असा थेट प्रश्न संजय शिरसाट यांना केला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे फकीर टाईप माणूस आहेत. ते काय सोडतील व काय घेतील? याचा काहीही अंदाज बांधता येत नाही. कदाचित ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील किंवा स्वीकारणारही नाही. यासंबंधी कोणताही अंदाज बांधता येत नाही. कदाचित हे पद शिंदेंऐवजी अन्य एखाद्या नेत्याला दिलं जाईल. पण शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर आम्ही ते अजिबात सोडणार नाही.
शिवसेनेने सीएम पदावरील दावा सोडला नाही
संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला नसल्याचंही ठणकावून सांगितलं. आम्ही मुख्यमंत्रीपदावरील दावा अद्याप मागे घेतला नाही. भाजपला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही यासंबंधीचा निर्णय भाजपच्या नेतृत्वावर सोपवला आहे, असंही ते म्हणाले आहेत.