Charan Singh Rajput : सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यावर भ्रष्टचाराचे आरोप केले होते त्या पोलीस अधिकाऱ्याला राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे उत्कृष्ट तथा गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल ‘विशेष मोहीम पदक’ जाहीर करण्यात आला आहे. 2023-24 वर्षासाठी उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत (Charan Singh Rajput) यांना ‘विशेष मोहीम पदक’ जाहीर करण्यात आले आहे. हफ्ते घेऊन बेकायदेशीर बार आणि पब सुरु ठेवण्याचा आरोप रवींद्र धंगेकरांकडून करण्यात आला होता.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या संकल्पनेतून राज्य उत्पादन शुल्क विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चरणसिंह राजपूत यांच्यासह सर्व पदक व सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
चरणसिंह राजपूत यांच्या नेतृत्त्वात एप्रिल 2022 ते जुलै 2024 या कालावधीत पुणे जिल्ह्यात गुन्हे अन्वेषणअंतर्गत एकूण 9 हजार 179 गुन्हे दाखल करुन 7 हजार 892 आरोपींना अटक करण्यात आली होती तर या आरोपींकडून 43 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता तसेच या कालावधीत हातभट्टी निर्मिती, वाहतूक व विक्री याविरुद्ध 5 हजार 722 गुन्हे, ताडी 682, परराज्यातील मद्य 37 , ढाब्यावर 1 हजार 566 गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याच बरोबर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत आरोपी विरुद्ध चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याकरिता संबंधित दंडाधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त यांना 945 प्रस्ताव सादर करण्यात आले होते त्यापैकी 417 आरोपींकडून सुमारे 1 कोटी 43 लाखाहून अधिक रकमेचे बंधपत्र घेण्यात आले तसेच अवैध मद्य विक्री आणि मद्य सेवन करणाऱ्या 542 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1 हजार 200 ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यापैकी 476 आरोपींकडून 14 लाख 34 हजार 602 इतका दंड वसूल केला आहे.
‘संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही’, महंत रामगिरी महाराजांसमोर शिंदेंची ग्वाही
अवैध मद्य व्यवसायात गुंतलेल्या 49 इसमाविरुध्द वारंवार गुन्हे नोंदवून तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र जातीय समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये 11 आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.