नितीन राऊतांच्या लेकाला आमदारकीचं स्वप्न; चंद्रपूरकर पूर्ण करणार?
उमेदवार स्थानिक हवा की बाहेरचा हवा? दारुबंदी व्हावी की दारु पाहिजे? चंद्रपूरमध्ये (Chandrapur assembly constituency.) मागच्या तिन्ही निवडणुका याच मुद्द्याभोवती फिरत राहिल्या. विकासाचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा, रोजगाराचा मुद्दा फार क्वचित इथल्या निवडणुकीच्या प्रचारात बघायला मिळतो. दारु या मुद्द्यावरती आधी काँग्रेसच्या बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) आणि आता प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. तर उमेदवार स्थानिक हवा की बाहेरचा हवा या मुद्द्यावर किशोर जोरगेवार यांनी विधानसभेची निवडणूक दोनवेळा लढली आणि एकदा जिंकली देखील. त्यामुळे चंद्रपूरमध्ये आजही विकासापेक्षा याच मुद्द्यांवर निवडणूक फिरती. अशा या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची कितपत शक्यता आहे? चंद्रपूरकर कुणाल राऊत यांना साथ देऊ शकतात का? (Senior Congress leader Nitin Raut’s son Kunal Raut is keen to contest from Chandrapur assembly constituency.)
पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा 1995 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण भाजप-शिवसेनेच्या वादळात 1995 साली सुधीर मुनगंटीवार इथून विजयी झाले आणि मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपकडे आला. 1999 आणि 2004 मध्येही मुनगंटीवार सहजपणे विजयी झाले. चंद्रपूरमध्ये नव बौद्ध समाजाची संख्या मोठी आहे. परिणामी 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर मुनगंटीवार बल्लारपूरला शिफ्ट झाले. मतदारसंघ राखीव होताच चंद्रपूरमध्ये भाजपमधील अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली. त्यापैकीच एक होते किशोर जोरगेवार.
सुधीर मुनगंटीवार यांचा हात धरुन राजकारणात आलेले नेते. मुनगंटीवार जोरगेवार यांनाच तिकीट देण्यासाठी आग्रही होते. पण त्यांना भाजपचे तत्कालिन खासदार हंसराज अहिर यांचा खोडा होता. मुनगंटीवार आणि अहिर यांच्या संघर्षात जोरगेवारांचे नाव फायनल होत नव्हते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरच्या नाना शामकुळे यांना चंद्रपूरला पाठविले. शामकुळेंना चंद्रपूरमध्ये प्रचंड विरोध झाला, बाहेरचा उमेदवार म्हणून टीका झाली, जोरगेवारांनी भाजपची साथ सोडली. पण मुनगंटीवार व अहिर यांनी गडकरींपुढे नमते घेतले आणि शामकुळे पहिल्यांदा आमदार झाले. 2014 मध्येही असाच विरोध असताना ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यावेळी जोरगेवार यांनी बंडखोरी करत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. कुमकवत पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांची तोकडी फौज असतानाही त्यांनी 50 हजार मते घेतली.
Ground Zero : महाडिक संपणार की टिकणार? कोल्हापुरात पुन्हा दिसणार ‘राजकीय थरार’
2019 यंदा तरी शामकुळे यांना भाजप बदलले अशी अपेक्षा होती. पण भाजपने पुन्हा शामकुळेंवर विश्वास दाखवला. याचा व्हायचा तो परिणामी झालाच स्थानिक संघटनेतील नाराजी कमालीची वाढत गेली. या नाराजांची जोरगेवार यांना साथ मिळाली. भाजप आणि शिवसेनेचीही त्यांना छुपी मदत झाली. शिवाय स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा प्रकर्षाने जोरगेवारांनी लावून धरला. जोरगेवार त्या निवडणुकीत तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. निवडून येताच त्यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. पण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच ते शिवसेनेच्या वळचणीला गेले. तर महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या जहाजेत उडी घेतील. यंदा त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने ते शिवसेनेकडूनच लढवण्याची शक्यता आहे.
चंद्रपूरमध्ये एका बाजूला भाजप वाढत असतानाच काँग्रेसची संघटना रसातळाला गेली. 1995 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यातही 2009 पर्यंत काँग्रेस थोडीफार सुदृढ अवस्थेत होती. 50 हजार मतांचा गठ्ठा बाळगून होती. पण 2014 पासून आलेख ढासळत गेला. 2014 मध्ये स्वतंत्र लढतीत काँग्रेसला अवघी 25 हजार मते मिळाली. 2019 मध्ये बाळू धानोकर यांना लोकसभेला इथून 25 हजारांचे लीड मिळाले. पण ती जादू विधानसभेला चालली नाही. काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. महेश मेंढे यांना 14 हजार मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या लिडमध्ये काँग्रेस संघटनेच्या वाट्यापेक्षा बाळू धानोरकर यांचाच वैयक्तित प्रभाव जास्त होता, हे सत्य नाकारून चालणार नाही. शहराची महापालिकाही अनेक दिवसांपासूनच भाजपकडेच होती. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात 42 हुन अधिक नगरसेवकांनी महापालिका गाजवली.
यंदाच्या लोकसभेतही प्रतिभा धानोरकर यांनी 30 हजारांचे लिड घेतले आहे. त्यामुळे यंदाही काँग्रेस चार्ज झाली आहे. पण विधान सभेला काय होईल हे सांगणे थोडे अवघड जाते. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी काही दिवसांपासून दौरे सुरु केले आहेत. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत फिल्डिंग लावली आहे. राऊत अॅक्टिव्ह होताच काँग्रेसकडून इच्छुक असलेलेही अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. सध्या इथून भाजपचे माजी नगरसेवक राहुल घोटेकर यांनी काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी घेत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय काही डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते व दोन विधानसभा निवडणुकांचा अनुभव असलेले महेश मेंढे यांनीही तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या 40 माजी नगरसेवकांनीही राऊत यांच्या उमेदवारीला विरोध सुरु केला आहे. महाविकास आघाडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे गट) पक्षाचे बाळू खोब्रागडे यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे.
Pachora : इकडे भाजप, तिकडे बहीण… किशोरआप्पा आमदारकी कशी वाचवणार?
स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमध्ये बौद्ध आणि नवबौद्ध समाजाची मोठी मते आहेत. 2014 च्या विधानसभेत हा समाज भाजपच्या तर 2019 च्या लोकसभेत काँग्रेसच्या पाठीशी भक्कम उभा राहिला. ही मते विधानसभेलाही सोबत ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय 25 हजारांच्या आसपास वंचित बहुजन आघाडी, बसपा अशा पक्षांमध्ये विभागली गेली आहेत. ही मते फिरवता आल्यास काँग्रेसला मदत होऊ शकते. चंद्रपूरमध्ये दारुबंदी महत्वाचा मुद्दा आहे. भाजप दारुबंदीचे समर्थन करते, तर काँग्रेस दारुबंदी उठविण्याच्या समर्थनात आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेत येताच दारु बंदी केली होती. तर 2019 मध्ये महाविकास आघाडीने सत्तेत येताच आग्रहाने दारु बंदी उठवली होती. इथे भट्टी कामगार मोठ्या संख्येने आहेत. केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेत भाजपची सत्ता असूनही खराब रस्ते, उघडी गटारे, अतिक्रमणाची समस्या आणि अव्यवस्थित पाणी पुरवठा हे प्रश्न आजही कायम आहेत. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी देऊनही परप्रांतीयांना प्राधान्य मिळत असल्याने स्थानिकांमध्ये राग आहे.
याच या सगळ्या समस्यांवर कुणाल राऊत काय प्लॅन ऑफ अॅक्शन ठेवतात, बाहेरचा उमेदवार हा शिक्का कसा पुसून काढतात, प्रचारात या मुद्द्याला कसे उत्तर देतात, काँग्रेसच्या स्थानिक अस्वस्थांच्या विरोधावर कशी मात करतात हे बघणे महत्वाचे असणार आहे. यानंतरच त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते