मुख्यमंत्र्यांच्या सभेत पालकमंत्र्यांचं कोल्हेंना वडीलकीचं सांगण; चर्चा इशारा की सल्ला?
मुख्यमंत्र्यांच्या सभेत पालकमंत्र्यांनी आपल्यावरचा हल्ला परतावून लावत विवेक कोल्हेंना वडिलकीचा सल्ला दिला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत आशुतोष काळेंनी (Kale) नगराध्यपदासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी त्यावर उताविळपणा दाखवत घाई घाईने पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना उद्देशून ही उमेदवारी बाहेरच्या तालुक्यातील आकांनी दिली असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा धागा पकडून पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांच्याच सभेत आपल्या भाषणात विवेक कोल्हेंना निवडणुकीत संयम अत्यंत महत्वाचा असतो उतावीळ होवून चालत नाही असा सल्ला दिला आहे.
त्याचबरोबर मला आका म्हणा, नाही तर काही म्हणा मला त्याचं काही वाटत नाही. पण, जर आकाच्या मनात आलं तर काय होऊ शकतं याचा पण जरा विचार करा. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याची कोपरगाव शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत पालकमंत्र्यांनी आपल्यावरचा हल्ला परतावून लावत विवेक कोल्हेंना वडिलकीचा सल्ला दिला, कानपिचक्या दिल्या की? कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत मी काय करू शकतो असा गर्भित ईशारा दिला? त्यामुळे सभा जरी मुख्यमंत्र्यांची असली तरी चर्चा मात्र पालकमंत्र्यांच्या त्या वक्तव्याबाबत अनेक राजकीय विश्लेषकांनी तर्क वितर्क लावल्यामुळे त्याची चर्चा कोपरगावसह जिल्हाभर सुरु आहे.
राज्यभर नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रचार सभांना जोर चढला असून महायुतीचे भाजप, शिवसेना(शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तीनही पक्ष जरी राज्यात सत्तेवर असले तरी आघाडी आणि युती करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना हे तीनही पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असून याला कोपरगाव देखील अपवाद नाही. कोपरगावच्या काळे-कोल्हेंचे निवडणुकीतील राजकीय द्वंद्व संपूर्ण राज्याला ठाऊक असून सुरु असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीतही ते थांबलेले नाही आणि यापुढेही थांबणार नाही.
परंतु सोमवार (दि.२४) रोजी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हेंसाठी राज्याचे मुख्यमंत्री कोपरगावात आले होते.त्यावेळी विवेक कोल्हेंनी बालीशपणे पालकमंत्र्यांना आका संबोधने त्यांच्या चांगलच अंगलट आले असल्याचे मुख्यमंत्र्यांसमोरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या वक्तव्यातून समोर आले आहे. ज्यावेळी विवेक कोल्हे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला घरातीलच उमेदवार दिला त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली.त्याच दिवशी विवेक कोल्हेंनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेवून काकांची उमेदवारी बाहेरच्या तालुक्यातील आकांनी ठरवली व काकांना भविष्य सांगणारे ज्योतिषी हा प्रवरेचे असतील अशा शब्दात त्यावेळी त्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांवर शरसंधान साधत आपली अराजकीय अपरिपक्वता सिद्ध केली होती.
त्याचा एकाचवेळी हिशोब मुख्यमंत्र्यांच्या सभेत मुख्यमंत्र्यांसमोरच पालकमंत्री विखे पाटलांनी चुकता केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मा.आ.स्नेहलता कोल्हेंनी आपल्या पराभवाचे खापर विखेंवर फोडून कोल्हे-विखे संघर्ष सुरु केला होता त्या संघर्षाला गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हेंनी विखेंचे पारंपारिक विरोधक बाळासाहेब थोरातांना सोबत घेवून खतपाणी घालत गणेश कारखान्याची सत्ता हस्तगत केली. त्यानंतर हा राजकीय संघर्ष अधिकच चिघळला गेला. त्यानंतर शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही विवेक कोल्हेंना पराभवाचे तोंड पहावे लागले.२०२४ च्या निवडणुकीत थांबून घ्यावे लागले व आ.आशुतोष काळे सव्वा लाखाच्या ऐतिहासिक मताधिक्याने पुन्हा विधानसभेत गेले. त्यानंतर होत असलेली हि कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक कोल्हेंच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची असतांना पालक मंत्र्यांनी कोल्हेंना दिलेला सूचक ईशारा जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांच्या उमेदवारीवरून प्रवरेचा ज्योतिषी, जनता आका आणि काका यांचा बंदोबस्त करतील असे एक ना अनेक वक्तव्य केली होती. सोशल मीडियामुळे हि माहिती जशीच्या तशी पालक मंत्र्यांपर्यंत पोहचली असणारच. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्रता प्रकरणात न्यायालयाचा काळे गटाच्या बाजूने दिलेला निर्णय असेल असे एक ना अनेक धक्क्यावर धक्के कोल्हे गटाला बसत असतांना कोल्हेंच्या सर्वच वक्तव्याचा पालकमंत्री विखे पाटलांनी कोल्हेंच्याच व्यासपिठावर मुख्यमंत्र्यांच्या समोर एकत्रित समाचार घेवून कोल्हेंना सल्ला दिला? ईशारा दिला? की, कोल्हेंच्या भाषेत प्रवरेचा ज्योतिषी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचे भविष्य सांगून, आकाच कोल्हेंचा बंदोबस्त तर करून गेले नाही ना? याची जोरदार चर्चा सुरु असून त्यासाठी तीन तारखेची वाट पहावी लागणार आहे.
