पुणे : जे कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास. पुन्हा असे काही केले तर मला ‘शरद पवार’ म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना दिलेल्या तंबीची आज राज्यभरात चर्चा होत आहे.
पवार यांच्या या तंबीनंतर सुनिल शेळके यांनीही “मी दम दिल्याचा पुरावा द्या, अन्यथा खोटे आरोप केल्याचे कबूल करा”. असे म्हणत पवारांना प्रतिआव्हान दिले आहे. तसेच या बाबतीत मी त्यांना जाऊन भेटणार आहे. त्यांना विचारणार आहे की, मी कुणाच्या वाटेला गेलो? माझी काही चूक झाली? आपण सांगावे. त्यांनी जे वक्तव्य केले. त्याची मी नक्कीच दखल घेणार, असेही शेळके म्हणाले. (Sunil Shelke recently warned Sharad Pawar’s old colleague, former Maval MLA Madan Bafna.)
दरम्यान, शरद पवार यांनी दिलेल्या या तंबीमागे शेळके यांची नेमकी कोणती गोष्ट त्यांना खटकली, शेळके यांनी कोणाला दम दिला होता? असे सवाल विचारले जात आहेत. अशात सुनील शेळके यांनी अलिकडेच शरद पवार यांचे जुने सहकारी, मावळचे माजी आमदार मदन बाफना यांना दम दिला होता. त्यापाठोपाठ आजच्या मेळाव्यात पवार यांनी येऊ नये यासाठी शेळके आणि काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याची तक्रार कानावर आल्याचे पवार यांनी सांगितले. या सगळ्या गोष्टींवरुनच पवार यांनी शेळके यांना तंबी दिली असल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर मदन बाफना यांनी त्यांच्यावर टीका केली होती. “शरद पवार आमचे नेते आहेत. आज काल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिलेली नाही. बापाला विसरायचे नसते. संस्कार सगळ्यांनी सोडले आहेत. असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी बोलून दाखवणार आहे, अशी टीका बाफना यांनी अजित पवार यांच्यावर केली होती.
त्यावर डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या मावळ तालुक्यातील मेळाव्यात सुनील शेळके यांनी बाफना यांना प्रत्युत्तर देताना “बाफना साहेब माझ्या नेत्याबद्दल बोलू नका, नाहीतर तुमचा हिशेब मी काढेल” अशी धमकी दिली होती. मदन बाफना यांना शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी म्हणून ओळखले जाते. पवार यांनीच त्यांना 1980 आणि 1985 मध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट देत निवडून आणले होते. आजही बाफना हे शरद पवार यांच्याच सोबत आहेत.
“मला बाफना साहेबांना विनंती करायची आहे की, तुम्हाला देखील मावळच्या माय बाप जनतेने डोक्यावर घेतले. पण तुमचा काळ वेगळा होता, आमचा काळ वेगळा आहे. तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत खूप फरक आहे. बाफना साहेब वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्या. तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा. आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर हरकत नाही. तुम्ही तुमची भूमिका घ्या, आम्ही आमची भूमिका घेतो. परंतु दादांना, चुकीच्या पद्धतीने बोलू नका. चुकीची स्टेटमेंट करू नका.
आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर तुम्हाला जशास तसे उत्तर देणार. आम्ही तुमचा मान ठेवतो तुम्ही.आमच्या नेत्याचा मान ठेवा. पण आमच्या नेत्याबद्दल काही बोलले तर मी तुमचा हिशोब काढणार, एवढे माझे तुम्हाला सांगणे आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे. खूप चांगली कामे करतो, असे म्हणणारा माणूस दोन महिन्यात अचानक का बदलले मला माहित नाही, असेही शेळके यांनी बोलून दाखविले होते.
आजच्या लोणावळ्यातील मेळाव्यासाठी “तुम्ही येऊ नये यासाठी आमदारांनी आणि काही जणांनी दमदाटी केल्याचे मला सांगितले. टीका करणाऱ्यां काहींना फोन करण्यात आल्याची तक्रारही कार्यकर्तांनी माझ्याकडे केली. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्यावर टीका करायची नाही का? असा संतप्त सवाल करत शरद पवार यांनी सुनील शेळकेंना फैलावर घेतले.
पवार पुढे म्हणाले की, तु आमदार कुणामुळे झाला? त्यावेळी सभेला इथे कोण आले होते? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवालच पवारांनी आमदार शेळकेंना उद्देशुन केला. जे कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास. पुन्हा असे काही केले तर मला ‘शरद पवार’ म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.