Nila Vikhe Patil : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात मोठी मजल मारत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून संसदेत प्रवेश केला आहे. 41 वर्षीय नीला या ग्रीन पार्टीच्या नेत्या असून स्वीडनच्या 349 सदस्यांच्या रिक्सदागमध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यांचा संसदीय कार्यकाळ 28 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असल्याची अधिकृत नोंद आहे. नीला या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत.
नीला यांच्या निवडीनंतर त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचं अभिनंदन करत ही संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं होतं. मात्र, यानंतर नीला यांनी पीटीआयशी बोलताना विखे पाटील कुटुंबाशी असलेल्या आपल्या सध्याच्या संबंधांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्याशी गेल्या दशकभरापासून आपला संपर्क नसल्याचं त्यांनी सांगितलं.
विखे घराण्याची लेक खासदार ! नीला अशोक विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री
सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडीओ आपल्याला पाठवण्यात आला होता, असा दावा नीला यांनी केला. त्यात स्वीडनमध्ये विखे कुटुंबातील एक सदस्य खासदार झाल्याचा उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या यशाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचंही नीला यांनी म्हटलं. त्यांचं आणि काका राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकारण आणि विचारसरणी वेगळी असल्याचं सांगताना, आपण ग्रीन पार्टीशी असलेली बांधिलकी कायम ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, नीला यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार म्हणून निवड झाल्यानंतर फोन करून अभिनंदन केल्याचंही सांगितलं. मात्र, त्यापलीकडे आपला काका किंवा चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी कोणताही नियमित संपर्क नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्वीडनमध्ये राजकीय सल्लागार म्हणून काम केल्यानंतर आणि स्टॉकहोम सिटी कौन्सिलमध्ये जबाबदारी सांभाळल्यानंतर नीला यांनी आता राष्ट्रीय संसदेत प्रवेश केला आहे.
