कडेगाव-पलूसमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; विश्वजित कदम यांच्या नेतृत्व, संघटन आणि रणनीतीचा संगम

विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करण्यात आला.

Untitled Design 19

Untitled Design 19

The confluence of Vishwajit Kadam’s leadership, organization and strategy : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल केवळ स्थानिक पातळीवरील विजय-पराभवापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यांनी तालुक्यातील राजकीय प्रवाह आणि आगामी सत्तासमीकरणांचे संकेत स्पष्ट केले आहेत. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा परिषदेचे चारही गट आणि पंचायत समितीच्या आठपैकी सात जणांवर विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

या निकालाचे विश्लेषण करताना सर्वप्रथम लक्ष वेधते ते म्हणजे संघटनात्मक ताकद. निवडणुकीपूर्वी विश्वजित कदम यांनी गावागावांत बैठका घेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. शेळकबाव, कोतवडे, खेराडे वांगी, भिकवडी, येतगाव, तोंडोली, हिंगणगाव खुर्द, तडसर अशा गावांमध्ये प्रचारयंत्रणा सक्रिय करण्यात आली. ही मोहीम केवळ औपचारिक प्रचारपूरती मर्यादित नव्हती, तर स्थानिक पातळीवरील गटबाजी कमी करून एकसंध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून आला.

काँग्रेसने या निवडणुकीत एकत्रित नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार ही दोन प्रमुख सूत्रे वापरली. विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करण्यात आला. यामुळे ग्रामीण मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेस आघाडीवर राहिली, हे संघटनात्मक तयारीनेच फलित मानले जात आहे. तालुक्यातील 54 गावांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. मात्र काँग्रेसच्या मजबूत बूथरचना आणि कार्यकर्त्यांछ्या सक्रिय सहभागामुळे निकाल एकतर्फी झुकताना दिसला.

टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल

विशेषतः कडेपूर गटातील निकाल हा या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला. कडेपूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होत. मात्र हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातून डॉ. जितेश हणमंतराव कदम यांनी अडीच हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवत समीकरणे बदलली. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून काँग्रेसच्या व्यापक रणनीतीचा भाग मानला जातो. त्यांच्या प्रभावामुळे जिल्हा परिषद गटातही काँग्रेसच्या विद्या कुंभार यांचा विजय सुलभ झाला.

या निकालातून दोन महत्वाचे संदेश स्पष्ट होतात. पहिला म्हणजे कडेगाव तालुक्यात काँग्रेसची पारंपरिक पकड अजूनही मजबूत आहे. दुसरा म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसने शिरकाव करण्याची क्षमता दाखवली आहे. पंचायत समितीत सत्तांतर घडवून आणत काँग्रेसने मागील पराभवाचा वचपा काढला आहे. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील संघटनकौशल्य आणि जनसंपर्क यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.

तथापि, या निकालातून भाजपसाठी देखील आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित होते. ग्रामीण भागातील नाराजी, स्थानिक नेतृत्वातील विसंवाद किंवा संघटनेतील कमतरता यांचा परिमाण या पराभवात दिसून येतो का? याच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एकूणच कडेगाव-पलूसमधील हा निकाल केवळ निवडणुकीचा आकडा नसून नेतृत्व, संघटन आणि प्रभावी रणनीती यांचा एकत्रित परिणाम आहे. काँग्रेसने या विजयातून तालुक्यात आपली राजकीय पुनर्स्थापना अधिक बळकट केली आहे. आगामी काळात या यशाचे रूपांतर व्यापक राजकीय वर्चस्वात होते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version