United Maharashtra Movement : महाराष्ट्राची गौरवगाथा विषद करणारे ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ या चित्रप्रदर्शनाचे उद्गाटन माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. आपल्या संपन्न… समृद्ध… प्रेरणादायी महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास हा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांपासून ते आपण प्रत्यक्ष आध्यात्मिक जीवनात कसं राहिलं पाहिजे याची प्रेरणा देणाऱ्या संतापर्यंत… यापुढे ही संत परंपरा या आधुनिक महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांपासून प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विकासाची गंगा ज्यांनी वाहिली त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा सगळा प्रवास एकाच ठिकाणी पहायला मिळाला असून हा प्रेरणादायी इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावा म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) हा रथ फिरवावा अशी अपेक्षा माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय परीश्रमपूर्वक अभ्यासपूरक सखोल माहिती मंत्रालयात सजवली आहे त्याबद्दल आशिष शेलार यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
गौरवशाली महाराष्ट्राच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक 1 ते 4 मे दरम्यान ऐतिहासिक अशा जांबोरी मैदानावर महाराष्ट्राची यशोगाथा सांगणारा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025 चे आयोजन केले होते. या महोत्सवात महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा सांगणारे भव्य असे पाच विविध दालनांचे चित्रप्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये महाराष्ट्राचे विचारसूत्र, महाराष्ट्र धर्म, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्र रत्न आणि आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्याच्या कामगिरीचा आढावा घेणारी चित्रप्रदर्शन प्रदर्शित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महोत्सवात सहभागी होताना या चित्रप्रदर्शनांच्या पाचही दालनांची पाहणी केली केल्यानंतर असेच प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्राची गौरवगाथा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगणारे हे प्रदर्शन मंत्रालयात मंत्री, अधिकारी व प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. महाराष्ट्राची विचारधारा, संतपरंपरेचा संदेश, महापुरूषांचे योगदान, भारतरत्न लाभलेल्या दिग्गज मराठी व्यक्तींचे कार्य आणि 65 वर्षात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहून योगदान दिलेल्या सर्व मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी माहिती या एकाच प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. नव्या पिढीला महाराष्ट्राची गौरवगाथा समजावी या हेतूने एकाच छत्राखाली समग्र महाराष्ट्राचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
‘भारत धर्मशाळा नाही…’, तमिळ निर्वासितांबाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
दरम्यान, “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025 ” या कार्यक्रमातंर्गत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दिनांक 22 मे रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या कराड येथील समाधीस्थळावर जाऊन नतमस्तक होणार आहेत तर दिनांक 23 मे रोजी सकाळी किल्ले रायगड येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महाड येथील चवदार तळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता कांदे मैदान, महाड येथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-2025 चा सांस्कृतिक सोहळ्याच्या कार्यक्रमाने सांगता समारंभ पार पडणार आहे.