Thieves arrested for stealing gold worth Rs 25 lakh : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झालं. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी, 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर लाखो समर्थकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील अनेक नामवंत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक या अंत्यविधीसाठी उपस्थित होते. मात्र, या शोकाकुल वातावरणातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीदरम्यान चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेत तब्बल 15 जणांचे सुमारे 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अंत्यविधीसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित असल्याने चोरट्यांनी या प्रचंड गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. संतप्त नागरिकांनी त्यांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं, तर काही संशयितांना पोलिसांनी थेट ताब्यात घेतलं. विशेष बाब म्हणजे, त्या दिवशी बारामती शहरात तब्बल आठ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणि परिसरात हजारो पोलिस असतानाही चोरट्यांनी इतकं धाडस दाखवत चोरीचा प्रयत्न केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात आठ ते दहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात राजकुमार बाबूराव आठवले (रा. गेवराई, जि. बीड), महम्मद अनिस महम्मद युनूस, येजाज भग्गू मिरावले, मोहमद सादिक मोहमद सिराज (सर्व रा. दिग्रस, जि. यवतमाळ), बाळू बबन बोत्रे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) आणि त्याचे दोन मित्र अशा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रणजित बाबासाहेब जाधव आणि रमेश लालासाहेब वाबळे यांनी तालुका पोलिसात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादींमध्ये विजया गजानन पवार, नीलेश लक्ष्मण काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, विश्वजित तुपे, सतीश सातकर, अमोल ताटे, अंकुश दिघे, प्रशांत सपकळ आणि विकास भागवत यांचा समावेश असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवार यांच्या नावाने स्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्मारकासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केल्याचंही समोर आलं आहे.
