Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन तरुणींसह चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या तरुणींनी दिल्लीहून मुंबईपर्यंत पिस्तूल आणून ते हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींपर्यंत पोहोचवण्याची भूमिका बजावली. 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला होता. या घटनेत टायगर थोडक्यात बचावला, मात्र त्याचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
फडणवीस हिम्मत असेल तर बिष्णोईला साबरमती जेलमधून खेचून आणा ; उद्धव ठाकरेंचे चॅंलेज
दिल्ली आणि हरियाणातून आरोपी ताब्यात
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एनडीआर युनिटने 20 ऑक्टोबर रोजी चार जणांना अटक केली. यामध्ये हरियाणातील 21 वर्षीय कुणाल आणि 19 वर्षीय सुमित, तसेच उत्तर प्रदेशातील 23 वर्षीय राधा आणि 23 वर्षीय बाबिता यांचा समावेश आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी आणि औपचारिक अटकेसाठी न्यायालयाची परवानगी घेतली. परवानगी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौघांना या प्रकरणात अटक केली.
हल्ल्याचा कट कसा आखण्यात आला?
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, कुणालची काही काळापूर्वी जामिनावर सुटका झाली होती. हरियाणातील हरसाना गावातील एका मित्राच्या माध्यमातून त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये एन्क्रिप्टेड ॲपच्या मदतीने संपर्क सुरू होता. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि 20 काडतुसे मिळवली. यासाठी सुमितही त्याच्यासोबत गेला होता.
2019 मध्ये भाजपच्या नावावर लढलात आणि सत्तेसाठी काय केलं?, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान, सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. तपासानुसार, कुणालने राधाला आपल्या कारवायांची माहिती दिल्यानंतर तिला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केले. 15 ऑक्टोबर रोजी तो राधा आणि बाबिताला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घेऊन गेला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल हा अनिल पंडितच्या संपर्कात राहून त्याच्याकडून सूचना घेत होता.
दादरमध्ये मुक्काम, अल्पवयीन मुलाकडे दिली बॅग
17 ऑक्टोबर रोजी राधा आणि बाबिता मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. त्याच दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर अनिल पंडितने कुणालला मुंबईत अडकलेल्या गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या सुटकेची व्यवस्था करण्यास सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
गोळीबारानंतर तरुणी दिल्लीला रवाना
गोळीबार झालेल्या दिवशीच राधा आणि बाबिता दादर येथून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने निघाल्या. 20 ऑक्टोबर रोजी दोघींना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे, कुणाल आणि सुमित यांना हरियाणातील सोनीपत येथून पकडण्यात आले.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर चार आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामागील संपूर्ण कट, आरोपींची भूमिका आणि इतर संबंधित बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
