Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, राजस्थानमध्ये मोठी कारवाई; तीन संशयितांना अटक
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना राजस्थानमधील कोटी येथील रेल्वे कॉलनीतून ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. गोळीबार प्रकरणानंतर तिन्ही आरोपी अंधेरी रेल्वे स्थानकारव दिसले होते, तिथून त्यांनी दिल्लीकडे जाणारी ट्रेन पकडली होती. गोळीबारनंतर, मुंबई पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि शेजारील राज्यांच्या पोलिसांना या संशयितांच्या हालचालींबाबत सतर्क केले होते. ही माहिती तपास पथकाला आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत मोलाची ठरली.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, मुंबई पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत आणि हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार तसेच त्यांच्या साथीदारांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. हे संशयित महाराष्ट्राबाहेरून कदाचित परदेशातूनही कारवाया करत असावेत.आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलीस इतर राज्यांतील यंत्रणांशी समन्वय साधत आहेत आणि केंद्रीय तपास संस्थांचीही मदत घेतली जात आहे.
तिन्ही संशयित कोण आहेत?
टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) गोळीबार करणाऱ्या तिन्ही व्यक्तींची ओळख पटली आहे. हल्लेखोरांपैकी एक, फूल सिंग, हा हरियाणातील सोनीपतचा रहिवासी आहे. दुसरा हल्लेखोर, रेहान, हा देखील सोनीपतचाच आहे, तर तिसरा, हृतिक कुमार (उर्फ रोशन), हा बिहारमधील बेगुसरायचा आहे. राजस्थान पोलिसांच्या ‘अँटी-गँगस्टर टास्क फोर्स’ने (AGTF) या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मुंबई पोलिसांशी समन्वय साधून या संशयितांना अटक केली.
प्रकरण काय?
रविवारी, 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी, मुंबईतील जुहू परिसरातील ‘पुष्पा पार्क’ जवळ मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला होता. या हल्ल्यातून अभिनेता थोडक्यात बचावला, मात्र त्याचा चालक आणि जवळच असलेला एक रिक्षाचालक गोळ्या लागल्यामुळे जखमी झाले. मुंबई पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी त्यांनी 15 पथके तयार केली असून, सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे.