मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मिळवलेले यश खरे नसून ते “कृत्रिम कमळांचे” यश असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.

Untitled Design 14

Untitled Design 14

Uddhav Thackeray’s Shiv Sena attacks BJP’s success : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने हॅटट्रिक साधल्याचा दावा होत असताना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या विजयावर तीव्र शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपसह सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीका करण्यात आली आहे. नगरपालिका, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मिळवलेले यश खरे नसून ते “कृत्रिम कमळांचे” यश असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.

ही निसर्गनिर्मित कमळे नसून बनावट, चिनी मालाची कमळे असल्याची उपमा देत, भाजपचे यश खोट्या साधनांवर उभे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर बनावट शिवसेनेलाही मिळालेला विजय खरा कसा मानायचा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा उल्लेख करत ‘सामना’ने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली हळहळ मतपेटीतून व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पीछेहाटीचा गवगवा अधिक केला जात असल्याचा आरोपही अग्रलेखात करण्यात आला आहे.

शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने ग्रामीण जनतेच्या मतदान निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सहा महिन्यांत तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, तरीही मराठवाड्यात कमळ आणि धनुष्यबाणाला मिळालेले मत हे अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असताना, भाजपला दिलेला कौल म्हणजे “स्वतःच्या पायात गुलामीच्या बेड्या बांधून घेण्यासारखा” असल्याची कठोर टीका करण्यात आली आहे.

अजितदादांचा अपघात झाला त्या विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता? इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

मोदी सरकारच्या धोरणांवरही अग्रलेखातून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील बेरोजगारी, उद्योगांचा अभाव, साखर कारखानदारीतील संकट, महागाई, रोजगारनिर्मितीचे अपयश, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे अपूर्ण आश्वासन, महिलांची सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भाजपच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणाऱ्यांनी, मोदींनी नेमके काय केले की महाराष्ट्र समृद्ध झाला, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील मोक्याचे भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले गेल्याचा आरोप करत, ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’सारख्या योजनांची पोलखोलही करण्यात आली आहे.

अग्रलेखाच्या शेवटी ‘कमळदला’वर प्रतीकात्मक टीका करत शिवसेनेने म्हटले आहे की, भ्रष्ट पैशांनी तयार झालेल्या राजकीय चिखलात कमळ फुलत असले, तरी शेतकरी आणि कष्टकरी मात्र पुढील काळातही त्याच चिखलात रुतलेले राहतील. कारण याच कमळदला राज्याच्या ग्रामीण जीवनाची आणि अर्थव्यवस्थेची दलदल करून ठेवली आहे, असा घणाघात करत लेखाचा शेवट करण्यात आला आहे.

Exit mobile version