Maratha Reservation : मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण, दगडफेक आणि जाळपोळ अशा हिंसक घटनानंतर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल (1 नोव्हेंबर) राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस झाला नाही. सरकारने वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची धग अद्याप कायम आहे. (Union Home Minister Amit Shah has invited Home Minister Devendra Fadnavis and BJP State President Chandrashekhar Bawankule to Delhi.)
दरम्यान, आता या लढाईत केंद्रीय भाजपची एन्ट्री झाल्याचे चित्र आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीतून बोलावणे आल्याचे माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दुसऱ्या क्रमांकातील नेते अमित शाह यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांना दिल्लीला बोलावले आहे. अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दुपारी 3.30 वाजता फडणवीस, बावनकुळे यांची बैठक होणार आहे. यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पाण्याला हात लावणार नाही – जरांगे पाटील
गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी सांगितले की, राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
सरकारला आरक्षण द्यावेच लागणार
मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय मला सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोटे गुन्हे दाखल केल्या आहेत. जाणूनबुजून प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. आता मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे 6-7 टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मन की बातसाठी वेळ पण जरांगेंना फोन करण्यासाठी नाही :
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्याच हातात आहे. परंतु नरेंद्र मोदी हे प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. अमित शाह मिझोराममध्ये फिरत आहेत आणि महाराष्ट्र पेटलेला आहे. जरांगे पाटलांच्या जीवाच बरं वाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधानांनी बोलले पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.