Download App

राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; धुळ्यात गारपिटीनं पिकांचं नुकसान

मुंबई : हवामान विभागानं (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवलाय. त्यातच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, धुळे, जळगावसह अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलीय. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरु असतानाच पावसाला सुरुवात केली. तर कल्याण डोंबिवली, भिवंडीतही पावसानं दिवसभर हजेरी लावली. दुसरीकडं जळगावमध्ये अवकाळी पावसानं आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीनं (Hail Storm) पिकांचं मोठं नुकसान केलंय त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्येही जोरदार पाऊस झालाय.

ठाण्यात दिवसभर सोसाट्याचा वारा सुटला होता. कल्याण डोंबिवली, भिवंडी अशा विविध शहरात पावसानं दिवसभरात हजेरी लावली. त्यातच रात्री ठाणे शहरात देखील अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. ठाण्याच्या चंदनवाडी परिसरात होळी दहनाचा कार्यक्रम सुरु असताना पावसानं हजेरी लावली. होळी दहन करणाऱ्या नागरिकांनी पावसाचा आनंद घेत होळी साजरी केली आहे.

ठाकरेंना सीएमपद सांभाळता आले नाही, ते पीएम पद काय सांभाळतील?; रामदास आठवलेंचा खोचक टोला

हवामान विभागानं येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. राज्यात सोमवारी (दि.6) काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. मात्र मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यातच दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला. वाऱ्यासोबत धूळही हवेत उडाल्यानं कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसानं हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला.

धुळे जिल्ह्यात अवकाळी रविवारी पाऊस सोमवीरी गारपीट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. एकीकडं संपूर्ण राज्यात होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत असताना दुसरीकडं निसर्गानं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. जिल्ह्यातील खोरी टिटने भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामुळं पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. अक्षरशः रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली असून ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय.

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय. जळगाव जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यात जोरदार वादळी वारा झाल्याने केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालीय.

शिमग्याच्या दिवशीच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागांत सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसानं झोडपून काढलंय. गारपीटीनंतर तालुक्यातील शेतशिवारासह रस्ते बर्फाच्छादित झालंय. तालुक्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सोंगणीला आलेलं पिक गारपीटीमुळं आडवं झालंय. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या गहू, कांदा, द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

Tags

follow us