ठाकरेंना सीएमपद सांभाळता आले नाही, ते पीएम पद काय सांभाळतील?; रामदास आठवलेंचा खोचक टोला
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Elections) मोठं भाष्य केलं आहे. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं वक्तव्य केलं. राऊतांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत असून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी (Ramdas Athawale) उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
आपल्या देशात पंतप्रधानपदाचे 15-20 उमेदवार आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करणं, त्यांच्याविरोधात उभं राहणं हे कोण्या येड्यागबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली. आठवले यांनी सांगितलं की, 2024 ला देखील सत्तेत आम्हीच येऊ. कारण, आम्ही जनतेच्या हिताची कामे केली आहेत. मतदार आम्हालाच कौल देईल. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद संभाळता आले नाही, त्यामुळे ते पंतप्रधान पदाची खर्ची तरी काय सांभाळतील? पंतप्रधानपदासाठी ठाकरे सक्षम नाहीत, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत भेट झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे चर्चा होती. अशातच संजय राऊतांनी मोठं विधान केलं होतं. २०२४ लोकसभा निवडणुकीविषयी बोलतांना संजय राऊत यांनी सांगितले होते की, राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. उद्धव ठाकरेहे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं राऊत बोलले होते. त्यानंतर रामदास आठवलेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. पंतप्रधान होण येड्यागबाळ्याचं काम नाही. आणि उद्धव ठाकरे त्या पदासाठी पुरेसे सक्षम नसल्याचं आठवलेंनी सांगितलं.
जीभ हासडण्याची भाषा कराल तर… शंभुराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
यावेळी बोलतांना आठवलेंना सत्ता संघर्षावरही भाष्य केलं. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना लोकांची सहानभूती आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्याने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. याला लोकांचा पाठिंबा आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडूनसुध्दा पाठिंबा मिळेल. दरम्यान, ठाकरेंनी जर भाजपच युतीसोबत केले असती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असंही आठवले म्हणाले.