Download App

दगाफटका करणाऱ्या पाचपैकी पहिल्या आमदाराला काँग्रेसचा दणका; सुलभा खोडके पक्षातून निलंबित

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

MLA Sulbha Khodke: राज्यात विधानसभा निवडणुकीआधी अनेक घडामोडी घडत आहेत. पक्षांतराच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काही जण दुसऱ्या पक्षात जाण्याचीही तयारी करत आहेत. या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही सतत पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी मिळाल्याने खोडके यांना निलंबित करण्यात आल्याचे यांनी पत्रात म्हटले आहे.

आमदार सुलभा खोडके यांच्या निलंबना पाठीमागे अनेक कारणे आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून सुलभा खोडके काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मते फुटली होती. काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला होता. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या  आमदारांची नावे बाहेर आली नव्हती. मात्र यात सुलभा खोडकेही आहेत अशी चर्चा होती.

विधानपरिषद निवडणुकीत ज्या आमदारांवर क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाही असा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला होता. त्यामुळे आमदार खोडके यांना काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही हे निश्चित झालं होतं. त्यामुळे सुलभा खोडके लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. या पक्षांतराच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने आमदार सुलभा खोडके यांना थेट पक्षातूनच निलंबित केले आहे.

काँग्रेसकडून सातत्याने अपमान व्हायचा : खोडके

दरम्यान, सुलभा खोडके यांनीही काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. विधानपरिषद अथवा राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं म्हणता मग पक्षातून का काढलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर नाना पटोले यांच्याकडे बॅलेट परत केले होते. प्रदेश काँग्रेसचे निमंत्रण मिळायचे पण स्थानिक काँग्रेसकडून हेतूपुरस्सर डावलले जात होते, असा आरोप सुलभा खोडके यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला अमरावतीत आले होते. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार म्हणून मला खाली बसवण्यात आले. स्टेजवर फारशी गर्दी नव्हती तरीदेखील काँग्रेस आमदाराला जागा दिली नाही अशा प्रकारे अपमान केला जात होता असेही सुलभा खोडके म्हणाल्या होत्या.

हेही वाचा :

काकांनंतर अजित पवारही ॲक्शन मोडमध्ये, काँग्रेसला देणार धक्का, 3 आमदारांचे इनकमिंग?

Letsupp Special : अमरावतीत नवनीत राणांचा पराभव : पडद्यामागचे पाच ‘हिरो’

आम्ही नौटंकी केली तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही, कडुंनी राणांना सज्जड दम भरला 

follow us