Maharashtra Winter Session : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही सभागृहात उमटले. या हत्या प्रकरणावर चर्चेची मागणी करत काल विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर आज बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी याच मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले. हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आधी वाल्मिक कराडला अटक करा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
‘त्या’ गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे; सरपंच खून प्रकरणावर पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या
संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संतोष देशमुख यांना गाडी अडवून जेव्हा उचलून नेण्यात आलं तेव्हा त्यांचा सहकारी सोबत होता. या सहकऱ्याने पोलीस ठाण्यात वारंवार सांगितलं होतं की संरपंचांना उचलून नेले आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे. पण त्यावेळी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर दोन ते तीन तासांनी सरपंचाची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी हालचाल केली असे संदीप क्षीरसागर म्हणाले.
वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. आमदार क्षीरसागर यांनीही वाल्मिक कराडचे मोबाइल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. वाल्मिक कराडचे मोबाइल रेकॉर्ड पाहिले तर संपूर्ण प्रकरण उघड होईल. ६,९ आणि ११ तारखेचे त्याचे सीडीआर रेकॉर्डवर आणावेत. या वाल्मिक कराडमुळेच बीडमध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालं असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.
आता तर कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. वाल्मिक कराडवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आधीच त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केली. मी स्वतः त्या गावात गेलो होतो. गावकरी आता संतप्त झाले आहेत असेही आ. क्षीरसागर म्हणाले.
Beed Crime : मोठी बातमी! बीड जिल्हा हादरला; सरपंच पतीचं अपहरण करून केला खून